(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी संगीतविश्वात सध्या अल्बम गाण्यांची आणि त्यातील कलाकारांची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संगीत रसिकांसाठी एक नवीन गाणं भेटीला आलं आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संदेश विठ्ठल गाडेकर, सुरेश विठ्ठल गाडेकर निर्मित ‘चंद्राची कोर’ हे नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा या गाण्यातून मांडण्यात आली आहे. प्रेम, भावना आणि नात्यांची हळुवार गुंफण असलेल्या या गाण्याला आजच्या तरुणाईला आकर्षित करणारा आधुनिक संगीताचा साज देण्यात आला आहे. गाण्यातील दमदार ठेका, सुंदर व्हिज्युअल्स आणि कलाकारांचा डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या गाण्यात अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री सृष्टी आंबवले यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हे या गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे.
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय भाटे यांनी ‘चंद्राची कोर’ला संगीत दिलं असून, गायिका सोनाली सोनावणे आणि गायक रवींद्र खोमणे यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. तर गीतकार करण सावंत यांनी लिहिलेले शब्द गाण्याच्या भावनांना अधिक सुंदर बनवतात.
गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी मानसी आणि दीपक या जोडीने सांभाळली आहे. आधुनिक सादरीकरण, आकर्षक लोकेशन्स आणि भावनिक कथानक यामुळे ‘चंद्राची कोर’ हे गाणं सोशल मीडिया ट्रेंडमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिग्दर्शक जोडी मानसी आणि दीपक यांनी सांगितलं की, या गाण्यात फक्त डान्स नसून एक सुंदर भावनिक कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि फ्रेश अनुभवायला मिळावा यासाठी टीमने मेहनत घेतली आहे.






