(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Daayra movie: करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दायरा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. एक हरवलेली मुलगी आणि तिचा तपास करणारा पोलीस अधिकारी अशी या चित्रपटाची मुख्य कथा असल्याचे सांगितले जात आहे. मेघना गुलजार यांच्या आगामी क्राईम ड्रामामध्ये अभिनेता उपेंद्र चौहान यांचीही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
नवराष्ट्रसोबत नुकत्याच झालेल्या संवादात उपेंद्र चौहान यांनी त्यांच्या सध्याच्या कामाबद्दल, अभिनयाच्या प्रवासाबद्दल आणि आगामी ‘दायरा’ चित्रपटातील भूमिकेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. सध्याचा टप्पा त्यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या टप्प्यांच्या तुलनेत आता त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. आतापर्यंत केलेली तयारी आता प्रत्यक्ष कामात दिसत असून, पूर्वी तयारी करणे आणि काम शोधणे असा प्रवास होता; मात्र आता हाताशी काम आहे आणि त्या कामातून आणखी नवीन संधी मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांमध्येही आता लोक त्यांच्या भूमिका आणि चेहरा ओळखू लागले आहेत. यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही कलाकाराच्या प्रवासासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘ Sam Bahadur’पासून आजपर्यंतच्या प्रवासात अभिनेता म्हणून स्वतःमध्ये मोठा बदल झाल्याचे उपेंद्र यांनी सांगितले. प्रत्येक भूमिकेने त्यांना काहीतरी नवीन शिकवले असून, आता पात्रातील सूक्ष्म बारकावे समजून घेण्यासोबतच अभिनयातील सहजतेवर अधिक भर देतात
भूमिका निवडतानाही ते काही गोष्टींचा आवर्जून विचार करतात तसेच पात्राची कथेतील गरज आणि त्याची खोली यांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचते आणि त्या भूमिकेतून आपल्याला अभिनेता म्हणून काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते का, याचाही ते विचार करतात.
भूमिका स्वीकारल्यानंतर त्या पात्राची पार्श्वभूमी आणि स्वभाव समजून घेण्यावर त्यांचा भर असतो. दिग्दर्शकाचे व्हिजन समजून घेणे आणि पात्राच्या भावनांशी एकरूप होण्यासाठी योग्य तयारी व निरीक्षण करणे, ही त्यांच्या तयारीची महत्त्वाची प्रक्रिया आहे असं देखील ते म्हणाले.
सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही उपेंद्र यांनी यावेळी शेअर केला. दोघीही अत्यंत गुणी आणि व्यावसायिक कलाकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सेटवर त्यांच्यासोबत काम करताना सहजता आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
करीना कपूर खानसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना उपेंद्र यांनी तिच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे विशेष कौतुक केले. सेटवर पूर्ण तयारीने येणे, कॅमेऱ्यासमोर क्षणात पात्रात शिरणे आणि कामातील शिस्त या गोष्टी करीनाकडून शिकण्यासारख्या असल्याचे त्यांनी सांगितले.
‘दायरा’मधील आपल्या भूमिकेबाबत उपेंद्र यांनी फारसा खुलासा केला नाही. स्पॉइलर टाळत त्यांनी ही भूमिका अतिशय वेगळी असून कथेत एका महत्त्वाच्या वळणावर येणारी असल्याचे सांगितले. हे पात्र मानवी भावनांच्या एका वेगळ्या छटेला स्पर्श करते आणि प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी एखादी भूमिका पुन्हा करण्याची संधी मिळाली तरी तीच भूमिका तशीच्या तशी साकारण्याची इच्छा नसल्याचे उपेंद्र यांनी स्पष्ट केले. मात्र, जुन्या पात्राला नव्या पद्धतीने ‘अपग्रेड’ करण्याची संधी मिळाली, तर त्यांना ते नक्कीच आवडेल.
‘भौकाल’मधील राजेशची वेगळी कथा किंवा ‘चिडिया उड’मधील धनंजय राणा या पात्राला अधिक सखोलतेने मांडण्याची संधी मिळाली, तर त्या पात्रांच्या वेगवेगळ्या छटा दाखवायला आवडतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्याच भूमिका पुन्हा करण्यापेक्षा नवीन भूमिका आणि आव्हानांचा शोध घेत पुढे जाणे आपल्याला अधिक आवडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘फेम’ की आव्हानात्मक भूमिका?
प्रसिद्धी आणि आव्हानात्मक भूमिका या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असल्याचे उपेंद्र यांनी सांगितले. जास्त प्रसिद्धी मिळाल्यास आव्हानात्मक भूमिका निवडण्याच्या अधिक संधी मिळतात. त्याचप्रमाणे चांगल्या आणि आव्हानात्मक भूमिका केल्यास प्रसिद्धी मिळण्याची शक्यताही वाढते.
त्यामुळे एका अभिनेत्याच्या प्रवासात प्रसिद्धी आणि आव्हानात्मक भूमिका या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे उपेंद्र चौहान यांनी सांगितले. मेघना गुलजार दिग्दर्शित या क्राईम-थ्रिलरमध्ये अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्येही या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे






