Kaun Banega Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एखादा विजय खऱ्या अर्थाने खास कशामुळे ठरतो? ‘कोण होणार करोडपती’चा स्पर्धक ऋषिकेश मढवी याच्यासाठी विजयाचं महत्त्व केवळ स्वतः जिंकण्यात नसून, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यात आहे. कोण होणार करोडपातीच्या मंचावर माधुरी दीक्षित सोबत बोलताना ऋषिकेशनं सांगितलं की, या मंचावर त्याला चांगली रक्कम जिंकता आली, तर त्यातील काही भाग तो खेळण्याची संधी न मिळालेल्या आपल्या सहस्पर्धकांना देईल. त्याचा हा विचार ऐकून माधुरी देखील थक्क झाली. Kaun Banega Crorepati:
Shiv Thakare: यशाची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून काय करतो शिव ठाकरे? माधुरी दीक्षितसमोर दिलं उत्तर
आपल्या या विचारामागचं कारण सांगताना ऋषिकेश म्हणाला की, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आणि दोन भागांमध्ये तो स्वतःला खेळण्याची संधी कधी मिळणार, याची वाट पाहत होता. कार्यक्रमात येण्यापूर्वी त्याच्या गावात त्याच्याविषयी एक चित्रफीतही चित्रीत करण्यात आली होती. त्यामुळे गावातील सर्वांना तो या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती होती. अशा परिस्थितीत, खेळण्याची संधी न मिळताच घरी परतल्यावर गावकऱ्यांना काय सांगायचं, हा प्रश्न त्याला पडला होता.
स्वतःला आलेल्या या अनुभवातून ऋषिकेशला इतर स्पर्धकांची मनःस्थिती समजली. हॉट सीटवर बसण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांनाही निराश होऊन परतावं लागू शकतं, याची त्याला जाणीव आहे. आपल्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना सांगण्यासाठी त्यांच्याकडेही काहीतरी असावं, या भावनेतून त्यानं आपण जिंकलेल्या रकमेतील काही भाग त्यांच्यासोबत वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
ऋषिकेशचा हा संवेदनशील आणि मनाचा मोठेपणा दाखवणारा विचार ऐकून माधुरीनं ऋषिकेशचं कौतुक करताना म्हटलं, “क्या बात है! या मंचावर पहिल्यांदाच हे घडतंय!” आता ऋषिकेश किती रक्कम जिंकणार आणि सहस्पर्धकांना किती रक्कम मिळणार, हे पहायला विसरू नका आज रात्री 9 वाजता कोण होणार करोडपतीच्या आजच्या भागात.






