(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mahakali Teaser: ‘हनु-मान’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रशांत वर्मा आता आपल्या आगामी पौराणिक चित्रपट ‘महाकाली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, अक्षय खन्नाच्या अनोख्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना शुक्राचार्य यांच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नाने शुक्राचार्यांची भूमिका साकारली आहे. पौराणिक कथांनुसार, शुक्राचार्य हे असुरांचे गुरू होते. ते अत्यंत विद्वान आणि ज्ञानी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अक्षय खन्ना या भूमिकेत नेमका कसा दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती.
टीझरमध्ये अक्षय खन्नाचा लूक समोर येताच ही उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याचा वेगळा गेटअप, चेहऱ्यावरील भाव आणि दमदार आवाज यामुळे शुक्राचार्यांची व्यक्तिरेखा प्रभावी वाटत आहे.
“हा धर्म आहे की अधर्म?”
टीझरची सुरुवात एका मुलाच्या रडण्याच्या आवाजाने होते. त्यानंतर अक्षय खन्नाच्या आवाजात शुक्राचार्यांचा संवाद ऐकायला मिळतो. समुद्रमंथनापासून असुरांवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत तो “हा धर्म आहे की अधर्म?” असा सवाल करताना दिसतो.
टीझरमध्ये पुढे असुरांचा विजय आणि त्यांच्या मुक्तीची घोषणा ऐकायला मिळते. त्यानंतर अक्षय खन्नाचा दमदार लूक दाखवण्यात आला आहे. त्यातून शुक्राचार्यांच्या सामर्थ्याची आणि चित्रपटातील संघर्षाची झलक मिळते.
टीझरच्या शेवटी महाकालीचीही झलक पाहायला मिळते. ही भूमिका अभिनेत्री भूमी शेट्टी साकारत आहे. भूमी शेट्टी यापूर्वी कन्नड टीव्ही मालिका ‘किन्नरी’ आणि तेलुगू मालिका ‘निन्ने पेल्लादथा’मध्ये दिसली आहे. तिने ‘बिग बॉस कन्नड’मध्येही सहभाग घेतला होता.
टीझरमध्ये भूमी शेट्टीचा लूक पाहिल्यानंतर तिच्या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
टीझर पाहून चाहते म्हणाले, ‘अंगावर शहारे आले!’
‘महाकाली’चा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. अनेकांनी अक्षय खन्नाच्या लूकचं आणि त्याच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. एका चाहत्याने “अंगावर शहारे आले”, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने “अक्षय खन्नाला मर्यादा नाहीत”, असं म्हणत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं. काही चाहत्यांनी चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याची मागणीही केली आहे.
निर्मात्यांनी ‘महाकाली’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अक्षय खन्नाचा शुक्राचार्य अवतार आणि भूमी शेट्टीची महाकाली प्रेक्षकांवर किती प्रभाव पाडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






