(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aadi Anant Marathi Movie: नात्यांमधील प्रेम, आपलेपणा, सहवास आणि भावनांची गोष्ट हसत-खेळत मांडणाऱ्या आगामी मराठी चित्रपट **‘आदि अनंत’**चे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जेजुरी येथे श्री खंडोबाचा आशीर्वाद घेत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या पोस्टरमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेले हे दृश्य त्यांच्यातील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देते. त्यामुळे ‘आदि अनंत’ नेमक्या कोणत्या नात्याची गोष्ट सांगणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी असल्याने चित्रपटात धमाल आणि विनोदाची मेजवानीही पाहायला मिळणार असल्याचे संकेत पोस्टरवरून मिळतात.
दमदार कलाकारांची फौज
या चित्रपटात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
नात्यांमधील भावनिक अंतरावर भाष्य
आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातील भावनिक अंतर वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्या माणसांचा सहवास, प्रेम आणि आपलेपणा किती महत्त्वाचा आहे, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफली असल्याचे पोस्टरवरून जाणवते. कुटुंबातील नात्यांची ऊब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
‘प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी स्वतःला जोडावं’
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले, “नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत त्यातल्या मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांत जाणवते. ‘आदि अनंत’ करताना मला याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने जगवायचं होतं. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी कुठेतरी स्वतःला जोडावं, हा या चित्रपटामागचा माझा प्रयत्न आहे.”
‘प्रत्येकाला आपल्या माणसांची आठवण येईल’
निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे म्हणाले, “‘आदि अनंत’ ही प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. हा सिनेमा पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या घरातल्या, आपल्या माणसांची आठवण येईल, याची आम्हाला खात्री आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. ‘आदि अनंत’ येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






