(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Afra Tafri OTT Release: मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन ‘अफरातफरी’ हा नवा विनोदी कौटुंबिक सिनेमा ओटीटीवर दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित हा सिनेमा 13 नोव्हेंबर 2026 पासून मराठी झी5वर प्रदर्शित होणार आहे. मोहन आगाशे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने यांसारख्या दमदार कलाकारांची फळी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
‘अफरातफरी’ची कथा तीन भावांच्या आयुष्याभोवती फिरते. आर्थिक अडचणींमुळे तिघेही वेगवेगळ्या मार्गांनी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच त्यांच्या वडिलांचे निधन होते आणि त्यांच्या विम्यापोटी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण होते. ही रक्कम मिळवण्याच्या आशेने तिन्ही भाऊ वेगवेगळ्या योजना आखू लागतात. मात्र, त्यांच्या आर्थिक गरजा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि संशयास्पद निर्णयांमुळे एकामागोमाग एक गोंधळ निर्माण होतो. गैरसमज, मतभेद आणि अनपेक्षित घटनांमुळे कथेत विनोदाची रंगत वाढत जाते.
या सिनेमात मोहन आगाशे, संजय नार्वेकर, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत आसावरी जोशी, प्राजक्ता हणमघर, किरण माने, नेहा खान आणि हेमंत पाटील हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची ही फळी सिनेमाच्या कथेला अधिक रंगत आणणार आहे.
विशेष म्हणजे, हा सिनेमा केवळ विनोद आणि गोंधळापुरता मर्यादित नसून पैशांचा हव्यास, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक स्वार्थ यांचा कौटुंबिक नात्यांवर होणारा परिणामही दाखवतो. पैशांसाठी जवळच्या नात्यांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर कुटुंबातील नात्यांचे काय होते, हा महत्त्वाचा प्रश्न या सिनेमातून मांडण्यात आला आहे.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनी विनोद, नाट्य आणि भावनिक प्रसंगांची सांगड घालत ही कथा साकारली आहे. त्यामुळे कौटुंबिक नात्यांमधील गमतीजमती, भावांमधील संघर्ष आणि धमाल विनोदी प्रसंग अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आता हा गोंधळ मोठ्या पडद्यावरून ओटीटीवर येत असून ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबरपासून मराठी झी5वर पाहता येणार आहे.






