Actress Death: 'बेव्हरली हिल्स, ९०२१०' फेम अभिनेत्री किमरी जॉन्सन यांचं वयाच्या ५०व्या वर्षी हार्ट ॲन्युरिझममुळे निधन झालं. जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार.
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
Actress Death: हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘बेव्हरली हिल्स, ९०२१०’ आणि ‘ड्यूड, व्हेअर्स माय कार?’ यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल किमरी जॉन्सन (Kimmarie Johnson) यांचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. किमरी यांना हार्ट ॲन्युरिझम या गंभीर आजाराचं निदान झालं होतं. या आजाराशी झुंज देताना ४ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं होतं?
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किमरी यांना अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना गंभीर हार्ट ॲन्युरिझम झाल्याचं निदान केलं. सुमारे आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं.
किमरी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कॅमेरॉन निनो आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हॉलिवूडने केवळ एक प्रतिभावान अभिनेत्रीच नव्हे, तर सकारात्मक आणि उत्साही व्यक्तिमत्त्वही गमावलं आहे.
मॉडेलिंगपासून अभिनय आणि व्यवसाय क्षेत्रापर्यंतचा प्रवास
किमरी जॉन्सन यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर अभिनयक्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी त्या कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाल्या. ‘बेव्हरली हिल्स, ९०२१०’ या लोकप्रिय मालिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. डॅरेन स्टार यांनी तयार केलेली ही १९९० च्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीन ड्रामा मालिका होती. या मालिकेत कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स परिसरात राहणाऱ्या हायस्कूल आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे जीवन, मैत्री, प्रेम आणि संघर्ष दाखवण्यात आले होते.
अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच किमरी यांनी व्यावसायिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी ‘स्किनग्लो बाय किमरी’ (SkinGlow by Kimmarie) नावाचा स्वतःचा स्किनकेअर ब्रँड सुरू केला होता. त्यामुळे मनोरंजनविश्वासोबतच व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला.किमरी जॉन्सन यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.