(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Mamachya Govyala Jauya: मराठी चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची एक खास पर्वणी आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा धमाल मराठी चित्रपट आता ओटीटीवर दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण कुटुंबाला घरबसल्या गोव्याच्या सफरीचा आनंद घेता येणार आहे.
संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांचा लाडका मामा यांच्या गोव्याच्या प्रवासाभोवती चित्रपटाची कथा फिरते. सुरुवातीला हलक्याफुलक्या विनोदाने रंगणारा हा प्रवास पुढे सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित वळणांमुळे अधिक रंजक होत जातो. मित्रांची धमाल, कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री आणि गोव्याची मजा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांसारखे दिग्गज कलाकारही विशेष भूमिकांमध्ये झळकले आहेत.
ओटीटीवरील प्रदर्शनाबाबत विजू माने काय म्हणाले?
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनी ओटीटीवरील प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “चित्रपटगृहांमध्ये ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद खूप आनंद देणारा होता. प्रेक्षकांनी चित्रपटातील कलाकारांच्या केमिस्ट्रीला, विनोदाला आणि एकूणच मनोरंजनाला भरभरून दाद दिली. आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या माध्यमातून हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.”
तसेच ज्यांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला, त्यांना पुन्हा एकदा त्याचा आनंद घेता येईल. तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून हा चित्रपट पाहावा आणि गोव्याच्या ट्रिपचा आनंद घ्यावा, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत. आता हा धमाल मराठी चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध झाला असून प्रेक्षकांना घरबसल्या या गोवा सफरीचा आनंद घेता येणार आहे.






