(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच एक भन्नाट आणि मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अफरातफरी’ या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील नोटांचा पाऊस आणि पैशांच्या मागे धावणाऱ्या पात्रांमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली असून, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सने या चित्रपटासाठी सहयोग केला आहे.
‘अफरातफरी’च्या मोशन पोस्टरमध्ये गावाकडची पार्श्वभूमी पाहायला मिळते. हवेत उडणाऱ्या नोटा आणि त्या नोटांच्या मागे सुसाट धावणारी एकापेक्षा एक पात्रं या पोस्टरमध्ये दिसतात. कुणाच्या हातात बंदूक आहे, कुणाच्या चेहऱ्यावर चिंता आहे, तर कुणी पैशांच्या मागे धावताना दिसत आहे.
या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गीतेतील, ‘सोड चिंता असते ती चितेसमान, कर्म कर, तू ठेव गीतेचा मान’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते, फळाची चिंता सोडून दे’ या ओळी ऐकू येतात. त्यामुळे पैशांचा हा गोंधळ नेमका कशासाठी आहे आणि त्याचा पात्रांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘अफरातफरी’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पैशांभोवती फिरणारी गंमतीदार कथा आणि या कलाकारांची अभिनयाची रंगत यामुळे ‘अफरातफरी’चा हा गोंधळ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल, अशी अपेक्षा आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “‘अफरातफरी’ हा मनोरंजनाने भरलेला चित्रपट आहे. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत अनेक पात्रं आणि त्यांच्या वाट्याला येणारे मजेशीर प्रसंग यामुळे परिस्थिती अधिकच गुंतत जाते. मोशन पोस्टरमधून या गोंधळाचा अंदाज येतो. कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री, विनोद आणि सतत रंगणारी धावपळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
मोशन पोस्टरमधील नोटांचा पाऊस, पात्रांची धावपळ आणि गीतेतील ओळी यामुळे ‘अफरातफरी’ नेमकी कोणता गोंधळ घेऊन येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






