( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री अनुश्री माने हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आणखी एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. साध्या परिस्थितीतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनुश्रीने नुकतंच पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं. या आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
अनुश्रीच्या गृहप्रवेश सोहळ्याला तिचे मित्र आणि ‘बिग बॉस मराठी’ मधील सहकलाकारांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. तन्वी कोलते, रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामदार, विशाल कोटियन, राधा पाटील आणि प्रभू शेळके यांनी तिच्या नव्या घराला भेट देत शुभेच्छा दिल्या.
मात्र, या सर्वांमध्ये अभिनेता आणि विनोदी कलाकार सागर कारंडे याने शेअर केलेल्या पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अनुश्रीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने तिच्या संघर्षाचं आणि मेहनतीचं मनापासून कौतुक केलं.
पोस्टमध्ये सागर लिहितो, “स्त्रीनं ठरवलं तर ती अख्खं जग जिंकू शकते म्हणतात. माझ्या या पोरीनं इतक्या परिश्रमानं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करून यावर शिक्कामोर्तब केलंय. प्रयोगांच्या व्यग्रतेत पोस्ट करायला जरा उशीर झाला असला तरी वेळेत पोहोचून तिच्या आनंदात सहभागी होता आलं, याचं समाधान आहे. मला तुझा अभिमान आहे.”
View this post on Instagram
सागरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुश्री नव्या घरात त्याचं उत्साहाने स्वागत करताना दिसते. “तुमचं आमच्या घरात स्वागत आहे,” असं म्हणत ती त्यांचं स्वागत करते आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया पडते. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा, हास्य आणि आनंदाचे क्षण रंगतात.
व्हिडीओमध्ये पुढे सागर कारंडे अनुश्रीच्या आईकडे पाहत “बघितलं, पोरीनं घर घेतलं!” असं म्हणतो. त्यावर तिची आई हसत “हो” असं उत्तर देते. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवतो.
याशिवाय सागरने उपस्थित पाहुण्यांची भेट घेत धनंजय पोवार, अनुश्री आणि तिच्या आईसोबत फोटोही काढले. सागर कारंडेची ही भावनिक पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चाहत्यांकडून अनुश्रीच्या यशाचं आणि सागरच्या आपुलकीच्या शब्दांचं भरभरून कौतुक होत आहे.






