
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे निधन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
१९६० च्या दशकामध्ये विजयाबाईंनी प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीची चळवळ उभी करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. मूळचं नाव विजया जयवंत असं असून आधुनिक मराठी रंगभूमी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली होती. नाटक आणि विजया मेहता हे नाव म्हणजे एक असंच म्हटलं जातं.
विजया मेहता यांची पार्श्वभूमी
विजय मेहता यांचा जन्म हा गुजरातमधील बडोद्यात ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला होता. विजया यांनी आपलं शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आणि पदवी घेतली होती. यानंतर नाटकावरील प्रेमापोटी विजया मेहता यांनी दिल्लीमध्ये प्रसिद्ध रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर मुंबईत आदि मर्झबान यांच्याकडेदेखील त्यांनी अभिनयाचे आणि नाट्यशास्त्राचे रीतसर धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी हा वारसा जपला आणि अनेकांना आपल्या दिग्दर्शनाखाली तयार केले.
विजयाबाईंचा होता धाक
आपल्या कडक शिस्तीसाठी विजयाबाईंना रंगभूमीवर प्रसिद्ध होत्या. अनेक मोठमोठे कलाकार त्यांच्या तालमीखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झाले. यामध्ये नाव घ्यायची झाली तर कलाकारांची यादी ही न संपणारी आहे. नाना पाटेकर, अशोक सराफ, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार विजयाबाईंच्या तालमीत घडले. संवादफेकीपासून अगदी दृष्टीतूनही अभिनय कसा करायचा याची उत्तम जाण त्यांनी सर्व कलाकारांना दिली होती.
१९६० च्या दशकामध्ये विजया मेहता यांनी प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर, ज्येष्ठ्य अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत मिळून ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. प्रायोगिक नाटक म्हणजे काय हे या संस्थेने मराठी नाट्यसृष्टीला दाखवून दिले.
चित्रपटातही योगदान
विजया मेहता या केवळ नाटकासाठीच काम करत नव्हत्या तर त्यांनी चित्रपटातही काम केले आणि मोलाचं योगदान दिलं. ‘रावसाहेब’ (१९८६) आणि ‘पेस्तनजी’ (१९८८) या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन विजया मेहता यांनी केलं. याशिवाय ‘पार्टी’ (१९८४) आणि ‘कलियुग’ (१९८१) या चित्रपटांमध्ये त्यांनी कामही केलं. दूरचित्रवाणीवरील ‘स्मृतिचित्रे’ आणि ‘लाइफलाइन’ या दोन्ही मालिका विजयाबाईंनी केल्या होत्या आणि त्या खूप गाजल्या होत्या. अशा या दिग्गज विजयाबाई मेहतांना नवराष्ट्रचा मानाचा मुजरा!