फोटो सौजन्य - Social Media
‘आई तुळजाभवानी’ या लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना आता देवीच्या अलौकिक शक्तिरूपांचे विराट दर्शन घडणार आहे. निर्जला एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या पवित्र काळात मालिकेत ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना’ हा विशेष अध्याय सादर केला जाणार आहे. या काळात देवी तुळजाभवानी पाताळदेवीने रचलेल्या भयंकर कारस्थानाचा सामना करत मानवजातीचे रक्षण करताना दिसणार आहे.
मालिकेच्या कथेनुसार, भुलोकावर भक्तीचा चातुर्मास सुरू होऊ नये यासाठी पाताळदेवीने अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांच्या माध्यमातून विनाशकारी संकट निर्माण केले आहे. या संकटाचा निपात करण्यासाठी आदिमाया स्वतः सज्ज होते आणि देवी तुळजाभवानी चार वेगवेगळ्या दिव्य रूपांमध्ये अवतार धारण करते. या प्रत्येक रूपातून ती केवळ दुष्ट शक्तींचा नाश करत नाही, तर संकटांशी लढण्याचा आध्यात्मिक संदेश आणि जीवन जगण्याची प्रेरणाही देते.
या विशेष कथानकात एका शेतकरी कुटुंबातील चार भावांची कथा केंद्रस्थानी आहे. या चार भावांच्या आयुष्यात आलेल्या संकटांमधून देवी त्यांना कशी मुक्त करते आणि मानवजातीला कोणता बोध देते, हे मालिकेत दाखवले जाणार आहे. या प्रवासात भक्तांना आध्यात्मिक अनुभूतीसोबतच जीवनातील संकटांवर मात करण्याची प्रेरणादायी शिकवण मिळणार आहे.
सध्या ब्रह्मांडात तयार झालेले अंधुक ‘दिव्य स्वस्तिक’ हे या कथानकाचे महत्त्वाचे प्रतीक आहे. मृत्यूहारिणी, भयतारिणी, चिंतानाशिनी आणि व्यसनखंडिनी या चार शक्तिरूपांत देवी प्रत्येक विकारावर विजय मिळवत जाईल, तसे हे स्वस्तिक अधिक तेजस्वी होत जाईल. मात्र हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक असणार असून प्रत्येक विकाराशी निर्णायक संघर्ष रंगणार आहे.
या महासंग्रामातून देवी चारही भावांना कशी संकटमुक्त करेल, दिव्य स्वस्तिक पूर्णपणे कसे उजळेल आणि मंगलमय चातुर्मासाची सुरुवात कशी होईल, याची उत्कंठा आता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. मालिकेतील हा नवा अध्याय भक्ती, अध्यात्म आणि दैवी शक्तींचा संगम अनुभवण्याची संधी देणार आहे. ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना’ हा विशेष भाग दररोज रात्री ८:५० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, देवी तुळजाभवानीच्या चार अलौकिक शक्तिरूपांचे विराट दर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.






