विमा रखडला, यंदाही संकट! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, पावसाची दडी; शेतकरी दुहेरी संकटात
Amravati News: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने बसत आहे. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पीकविमा भरपाई अद्याप पदरात पडलेली नाही. एकीकडे गतवर्षीच्या भरपाईची प्रतीक्षा, तर दुसरीकडे यंदाच्या हंगामातील पिके वाचविण्याची धडपड, अशा दुहेरी संकटात अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे गतवर्षीचा पीकविमा कधी मिळणार आणि यंदाच्या नुकसानीतून शेतकऱ्यांना कोण दिलासा देणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून पंचनामेही करण्यात आले. त्यामुळे पीकविम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळेल आणि संकटातून काहीसा दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण परिसरातील होऊनही अनेक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे. शेतीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीवर केलेला खर्च आधीच वाढला आहे.
पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे या दृष्टीने अशा भेटी महत्त्वाच्या असल्या, तरी केवळ पाहणी आणि आश्वासनांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. गतवर्षीच्या प्रलंबित पीकविमा भरपाईसाठी शासन आणि संबंधित विमा कंपन्यांकडे ठोस पाठपुरावा करणे, तसेच यंदाच्या संभाव्य नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून नियमानुसार मदत मिळवून देणे आवश्यक आहे.
गतवर्षीच्या पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई तातडीने द्यावी. तसेच चालू हंगामातील पिकांच्या स्थितीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नैसर्गिक संकटांमुळे आधीच आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना शासनाने केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदतीचा आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गतवर्षी अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर यंदा मात्र पावसाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत नसून, जमिनीतील ओलावा कमी झाल्याचा परिणाम पिकांवर दिसू लागला आहे. काही भागांत पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे पीक वाचविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. मागील हंगामातील नुकसानीतून सावरता आले नसतानाच नव्या हंगामावरही संकट घोंगावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Ans: पीक नुकसानीची पडताळणी, पंचनामे, विमा दाव्यांची छाननी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया यामुळे काही वेळा विमा रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो.
Ans: पावसाची दडी, अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे पिकांची वाढ खुंटू शकते. उत्पादनात घट होण्यासोबतच पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
Ans: पीक विमा योजनेच्या लागू नियमांनुसार दुष्काळ, पावसातील खंड, अतिवृष्टी, पूर किंवा इतर अधिसूचित नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी पात्र शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळू शकते.






