( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या कामासोबतच ती वेगवेगळे अनुभव आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने रंगभूमीवर गाजत असलेलं ‘लग्नपंचमी’ हे नाटक पाहिलं. नाटक पाहिल्यानंतर तिने आपला अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केला आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर ‘लग्नपंचमी’च्या कलाकारांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने नाटकाचं भरभरून कौतुक केलं. प्राजक्ताने लिहिलं की, तिने आज एक सुंदर नाटक पाहिलं आणि ते म्हणजे ‘लग्नपंचमी’.
या नाटकाबद्दल सांगताना तिने लिहिलं, “लग्न झालेल्यांनी, लग्न करण्याची इच्छा असलेल्यांनी, लग्न न करण्याची इच्छा असलेल्यांनी… थोडक्यात सर्वांनी हे नाटक पहावं.” सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं हे नाटक मनोरंजन करेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
मधुगंधा कुलकर्णींचं केलं विशेष कौतुक
प्राजक्ताने ‘लग्नपंचमी’च्या लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांचं विशेष कौतुक केलं. या तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय सुंदरपणे सांभाळल्याचं प्राजक्ताने म्हटलं.
मधुगंधा यांच्या विचारांचं कौतुक करताना प्राजक्ताने लिहिलं की, “तुझ्या विचारांच्या प्रेमात तर मी फार पूर्वीपासून आहेच. आज नाटकातून पुन्हा ते अनुभवायला मिळाले.”
नाटकातील कलाकारांच्या अभिनयाचंही प्राजक्ताने कौतुक केलं. स्वप्नील जोशी यांच्या रंगमंचावरील नैसर्गिक वावराने आपण थक्क झाल्याचं तिने सांगितलं. त्यांचा लाईव्ह रंगमंचावरील अभिनय पाहणं हा एक वेगळाच अनुभव असल्याचंही प्राजक्ताने नमूद केलं.
तसंच विदुला चौगुले आणि मुकेश जाधव यांच्या कामाचंही तिने कौतुक केलं.
‘३ तास फारच मजेत गेले’
‘लग्नपंचमी’ पाहताना तब्बल तीन तास अतिशय मजेत गेल्याचं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे, प्रेक्षकांमध्ये तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि परेश मोकाशी हे देखील उपस्थित होते. त्यामुळे हा अनुभव आणखी खास झाल्याचं तिने म्हटलं.
अखेर प्राजक्ताने आपल्या चाहत्यांना ‘लग्नपंचमी’ नाटक आवर्जून पाहण्याचं आवाहन केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर ‘लग्नपंचमी’ नाटक पुन्हा चर्चेत आलं आहे.
Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज






