(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार अभिनयासोबतच उद्योजकतेतही यशस्वी वाटचाल करत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच अनेकांनी स्वतःचा व्यवसाय उभारून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, मृणाल दुसानीस, अभिनेता निरंजन कुलकर्णी, सत्या मांजरेकर आणि अनघा भगरे यांसारख्या कलाकारांनी खाद्यव्यवसायात पाऊल टाकत स्वतःचे उपहारगृह किंवा फूड ब्रँड सुरू केले आहेत. याच पावलावर पाऊल ठेवत आता मराठी अभिनेता समीर परांजपे यानेही उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडल्यानंतर समीरने आता स्वतःचे उपहारगृह सुरू करत नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे.
समीर परांजपे लवकरच उद्योजक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. अभिनयासोबतच आता तो खाद्यव्यवसायात उतरला असून, बार्शी येथे ‘परांजपे उपाहार गृह’ या नावाने शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू करणार आहे.
समीरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या उपहारगृहाचा अधिकृत लोगो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘परांजपे उपाहार गृह’ या नावाच्या लोगोमध्ये पारंपरिक मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळते. केळीच्या पानावर वाढलेले मिसळ-पाव, चहा, मेदू वडा यांसारखे लोकप्रिय पदार्थ लोगोमध्ये आकर्षक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.
समीर परांजपेने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांकडून आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्याच्या नव्या व्यवसायाचं सर्वांनी मनापासून स्वागत केलं.अभिनेत्री अक्षया नाईक, ऋतुजा बागवे, क्षमा देशपांडे, श्वेता मेहेंदळे आणि अभिनेता संग्राम समेळ यांच्यासह अनेक कलाकारांनी समीरच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
समीरच्या या नव्या उपक्रमाचे चाहते आणि सहकलाकारांकडून सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अभिनयानंतर आता खाद्यव्यवसायातही समीर आपली वेगळी ओळख निर्माण करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अभिनेता समीर परांजपे सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘मोहिनी’ मालिकेत आर.के. (RK) ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या आधी त्याने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.






