(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Vanita Kharat Weight Loss: कलाकार मंडळी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. डाएट असो किंवा व्यायाम, फिट राहण्यासाठी अनेक कलाकार सातत्याने मेहनत घेतात. याच यादीत आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वनिता वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असून, तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.
व्यायाम आणि डाएटशी संबंधित पोस्ट वनिता सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र, तिने आतापर्यंत नेमकं किती वजन कमी केलं, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. आता स्वतः वनिताने याचा खुलासा केला आहे.
वनिता खरातने अभिजात मराठी ओटीटीच्या ‘नक्की काय शिजतंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने चुलीवर कोळंबी सुक्का, पापलेट रवा आणि तवा फ्राय असे विविध पदार्थ बनवले. पदार्थ बनवतानाच वनिताने मनमोकळ्या गप्पाही मारल्या.
याच गप्पांदरम्यान तिला आतापर्यंत किती किलो वजन कमी केलं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वनिताने सांगितलं की, “मी आतापर्यंत २४ किलो वजन कमी केले आहे.”
‘आज माझा चीट डे आहे…’
वजन कमी केल्यानंतरही वनिताने कार्यक्रमात चुलीवर बनवलेले कोकणी पदार्थ मनसोक्त खाल्ले. याबाबत बोलताना ती हसत म्हणाली की, “मी आता असे पदार्थ खात नाही, पण आज माझा चीट डे आहे.”
त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात डाएटसोबतच अधूनमधून ‘चीट डे’ही ठेवत असल्याचं तिच्या बोलण्यातून समोर आलं.
वनिता खरात कोकणातील असल्यामुळे तिला कोकणी पदार्थांची विशेष आवड आहे. तिला कोणते पदार्थ आवडतात, असा प्रश्न विचारला असता तिने मासे, पिठीभात आणि भाजलेला बांगडा आवडत असल्याचं सांगितलं.
मासे हा तिच्या आवडीचा पदार्थ असल्याचंही वनिताने यावेळी सांगितलं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिने मासे खाल्ले असल्याचं तिने सांगितलं.
‘आईच्या हातचं जेवण सर्वात आवडतं’
वनिताला कुणाच्या हातचं जेवण सर्वाधिक आवडतं, असं विचारण्यात आलं असता तिने आपल्या आईचं नाव घेतलं. विविध ठिकाणी चांगलं जेवण मिळत असलं तरी आईने बनवलेलं जेवण आपल्याला सर्वाधिक आवडतं, असं तिने सांगितलं.
विशेषतः आईने बनवलेलं माशाचं सार म्हणजेच कालवण आपल्याला खूप आवडतं, असं वनिताने सांगितलं. त्यामुळे फिटनेसवर लक्ष देतानाही आपल्या आवडीच्या कोकणी पदार्थांशी असलेलं तिचं नातं कायम असल्याचं पाहायला मिळतं.
Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?






