( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनांपासून मुक्त होणं नाही, तर स्वतःचे विचार मांडण्याची, स्वतःचे निर्णय घेण्याची आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची ताकदही आहे. आजचा भारतीय आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडताना, निर्णय घेताना आणि नव्या संधींचा स्वीकार करताना दिसतो. या बदलाचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावरही जाणवत आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘झी मराठी’च्या मालिकांमधील कलाकारांनी स्वातंत्र्याचा त्यांच्यासाठी असलेला अर्थ आणि नव्या पिढीने जपावयाच्या मूल्यांबद्दल आपले विचार व्यक्त केले.
‘कमळी’ मालिकेतील ऋषी म्हणजेच अभिनेता निखिल दामले याच्या मते, गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होत असून, त्या संधींचा योग्य वापर करण्याची क्षमताही वाढत असल्याचं तो सांगतो.
मनोरंजन क्षेत्रातही हा आत्मविश्वास दिसून येत असल्याचं निखिलने सांगितलं. सामाजिक विषय असोत किंवा मानवी नातेसंबंधांशी संबंधित मुद्दे, आज अधिक स्पष्टपणे आणि ठामपणे मांडले जात आहेत. नव्या पद्धतीच्या कलाकृती आत्मविश्वासाने प्रेक्षकांसमोर आणल्या जात असल्याचा आनंद असल्याचं त्याने म्हटलं.
स्वातंत्र्याचा स्वतःसाठीचा अर्थ सांगताना निखिल म्हणाला, “स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याची एक संधी मला वाटते. जेव्हा आपल्याला स्वतःचे निर्णय घेण्याचं किंवा आपल्याला जे वाटतंय ते करण्याचं स्वातंत्र्य असतं, तेव्हा आपल्याकडून काहीतरी चांगलं घडू शकतं.”
आपल्या कलेतही स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं निखिल सांगतो. भूमिका आणि कला स्वतंत्रपणे सादर करण्याची मुभा मिळाल्यास सर्जनशीलता आणि कार्यक्षमता अधिक वाढते, असा त्याचा विश्वास आहे.
‘देशावरील प्रेम आणि आदर कमी होऊ नये’
नव्या पिढीला संदेश देताना निखिलने देशाविषयी प्रेम आणि आदरासोबतच स्वपरीक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. भारताचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि संस्कार यांचा सन्मान केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीत उणीव काढण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं त्याने सांगितलं.
‘सनई चौघडे’ मालिकेतील असावरीची भूमिका साकारणारी जुई गोगरी हिच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं आणि न घाबरता आपले विचार मांडणं.
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं किंवा न घाबरता स्वतःचे विचार मांडणं. जबाबदारीने वागणं आणि माझे निर्णय मी स्वतः घेणं. खरंतर मी माझ्या भूमिकांमधूनही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते,” असं जुईने सांगितलं.
आजचा भारत नव्या विचारांनी आणि आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचंही ती म्हणाली. मनोरंजन क्षेत्रातही आत्मविश्वासाने नवनवीन विषय मांडले जात आहेत. चित्रपट आणि मालिकांमधून देशाच्या मातीतील प्रेरणादायी कथा आणि वीरांच्या गाथा प्रेक्षकांसमोर येत असल्याचं तिने नमूद केलं.
‘तारिणी’ मालिकेतील कौशिकी म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या मते, गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि जागरूकता वाढली आहे.
कोविडनंतर नागरिकांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आल्याचं ती सांगते. रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना तिला मार्ग करून देणं, प्राण्यांवरील अत्याचाराबाबत आवाज उठवणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं, महिला, वृद्ध आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक होणं, वाहतुकीचे नियम पाळणं अशा अनेक गोष्टींमध्ये बदल दिसत असल्याचं अभिज्ञाने सांगितलं.
‘शाल-श्रीफळाऐवजी तुळशीचं रोपटं द्या’
कलाकार म्हणून सामाजिक जबाबदारी जपण्याबाबत अभिज्ञाने एक वेगळा विचार मांडला. विविध कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचा सत्कार करताना शाल आणि श्रीफळ देण्याऐवजी तुळशीचं रोपटं देण्याचा पर्याय तिने सुचवला.
दैनंदिन आयुष्यात पर्यावरण आणि समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असंही ती म्हणाली.
नव्या पिढीला संदेश देताना अभिज्ञाने स्वच्छता, प्राण्यांशी चांगलं वागणं आणि सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कचरा न करणं हीदेखील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचं तिने स्पष्ट केलं.
निखिल दामले, जुई गोगरी आणि अभिज्ञा भावे यांच्या विचारांमध्ये स्वातंत्र्याची व्याख्या वेगवेगळी असली, तरी त्यामागचा समान धागा म्हणजे स्वातंत्र्यासोबत जबाबदारी स्वीकारणं.
स्वतःची ओळख निर्माण करणं, निर्भयपणे विचार मांडणं, आपल्या कलेतून नवे विषय मांडणं आणि समाजासाठी छोट्या-छोट्या गोष्टी करणं, यामधून स्वातंत्र्याची खरी भावना जपली जाते. याच विचारांसह ‘झी मराठी’चे कलाकार यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून, स्वातंत्र्याची खरी ताकद आपल्या कृतीतून दिसून यावी, हाच त्यांचा संदेश आहे.






