( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीत महिलाकेंद्रित आणि भावनिक कथांचा ट्रेंड दिवसेंदिवस बळकट होताना दिसत आहे. अशातच एका आईच्या प्रेमाची, वेदनेची आणि न्यायासाठीच्या संघर्षाची कथा सांगणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने सोशल मीडियावर उत्सुकता वाढवली असून, एका सामान्य आईच्या असामान्य लढ्याची झलक प्रेक्षकांना भावत आहे.
ट्रेलरमध्ये एका सुखी कुटुंबाची गोष्ट उलगडताना दिसते. आपल्या मुलीच्या आनंदात स्वतःचं विश्व शोधणारी आई, तिचं साधं-सोपं आयुष्य आणि प्रेमाने भरलेलं कुटुंब… पण एका अनपेक्षित घटनेनंतर या कुटुंबावर संकट कोसळतं. यानंतर सुरू होतो एका आईचा भावनिक आणि थरारक प्रवास. भीती, असहायता आणि वेदना यांवर मात करत ती न्यायासाठी उभी राहते आणि तिच्यातील लढवय्या स्त्री जागी होते.
‘मर्दिनी’चा ट्रेलर केवळ भावनिक नाही, तर रहस्य आणि थरारानेही भरलेला आहे. कथानकात नेमकं काय घडलं, आई कोणाविरोधात लढत आहे आणि तिला न्याय मिळणार का, असे अनेक प्रश्न ट्रेलर पाहताना प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एका ताकदवान भूमिकेत झळकत असून, तिच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. प्रेमळ आईपासून अन्यायाविरोधात उभी ठाकलेल्या रणरागिणीपर्यंतचा तिचा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. तिच्यासोबत अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले आणि बालकलाकार मायरा वैकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक अजय मयेकर यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून भावना आणि थरार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभावी पार्श्वसंगीत, दमदार संवाद आणि वास्तववादी मांडणी यामुळे ‘मर्दिनी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडताना दिसत आहे.
एका आईच्या प्रेमाची ताकद किती मोठी असू शकते आणि आपल्या लेकरासाठी ती किती टोकाला जाऊ शकते, याची प्रभावी कथा सांगणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.






