( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ओटीटी विश्वात प्रेमकथांचा वेगळा ट्रेंड पाहायला मिळत असताना ZEE5 मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी आणि वास्तवाशी जवळीक साधणारी प्रेमकथा घेऊन येत आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या ओरिजिनल वेब सीरिजची घोषणा करण्यात आली असून, ही मालिका प्रेम, करिअर, महत्त्वाकांक्षा आणि आत्मसन्मान यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध घेणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय प्रमुख भूमिकेत झळकणार असून या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही केवळ एक प्रेमकथा नसून आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यातील वास्तव मांडणारी सीरिज असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांच्या मते, ही कथा प्रेम, महत्त्वाकांक्षा, कामाच्या ठिकाणच्या मर्यादा आणि वैयक्तिक मूल्ये यांमधील संघर्ष अधोरेखित करते. आधुनिक व्यावसायिक जगात प्रेम आणि करिअर यांचा समतोल साधताना अनेक तरुणांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याचं वास्तववादी चित्रण या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सीरिजचे दिग्दर्शक गौरव पत्की यांनीही या कथेचा वेगळेपणा स्पष्ट केला. त्यांच्या मते, प्रेमाला सीमा नसतात असं म्हटलं जात असलं तरी अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्यात प्रेम आणि करिअर यांचा समतोल राखणं सोपं नाही. वेगवान कार्यसंस्कृती, शहरी जीवनातील ताणतणाव आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत यांमधून मार्ग काढणाऱ्या तरुण जोडप्याची ही भावनिक कथा आहे. प्रेमाच्या विविध छटा आणि त्यातील अपूर्णतेतील सौंदर्य या मालिकेतून उलगडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन म्हणाला की, ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही पारंपरिक प्रेमकथा नसून आयुष्यातील दडपण आणि जबाबदाऱ्यांमध्ये उमलणाऱ्या प्रेमाची गोष्ट आहे. ऋषी ही व्यक्तिरेखा साकारताना व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक भावना यांमधील संघर्ष जवळून अनुभवता आला. त्यामुळे ही कथा आजच्या प्रेक्षकांना अधिक वास्तववादी आणि जवळची वाटेल, असा त्याचा विश्वास आहे.
तर अभिनेत्री जान्हवी उदयच्या मते, अनन्याचा प्रवास अनेक तरुण व्यावसायिकांना स्वतःचा वाटू शकतो. करिअर, महत्त्वाकांक्षा, भावना आणि वैयक्तिक मर्यादा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी ही कथा प्रेरणादायी ठरू शकते. अनेक अडचणींचा सामना करत असतानाही दोन व्यक्ती एकमेकांसोबत कशा विकसित होतात आणि नातं कसं अधिक मजबूत होतं, हे या मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.






