
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mirzapur The Movie: मिर्झापूर: द मूव्ही’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हा बहुप्रतीक्षित चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत असतानाच निर्मात्यांनी आणखी एक मोठे सरप्राइझ चाहत्यांसाठी राखून ठेवले आहे. प्रकल्पाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, लोकप्रिय हरियाणवी रॅपर, गायक आणि गीतकार ढांडा न्योलीवाला ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील एका खास रॅप ट्रॅकमध्ये झळकणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बूम शाका लाका’, ‘रशियन बंडाना’ आणि ‘नाइफ ब्राउज’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखला जाणारा ढांडा न्योलीवाला चित्रपटासाठी एक हाय-एनर्जी रॅप ट्रॅक सादर करणार आहे. हा रॅप ‘मिर्झापूर’च्या रफ-टफ आणि अॅक्शनने भरलेल्या विश्वाला साजेसा असून प्रेक्षकांना वेगळा संगीताचा अनुभव देणार आहे.
हरियाणातील न्योली गावचा रहिवासी असलेला ढांडा न्योलीवाला आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि दमदार हरियाणवी गाण्यांमुळे अल्पावधीतच इंडिपेंडंट म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक बनला आहे. त्याच्या सहभागामुळे चित्रपटाच्या संगीताला नवा फ्लेवर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे चित्रपटाचे निर्माते असून कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी सहनिर्माते आहेत. हा बहुप्रतीक्षित चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.