( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने 30 जुलै 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान ‘जीव माझा गुंतला’ फेम मराठी अभिनेता सौरभ चौघुले याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत डोंबिवलीतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सौरभ चौघुले आणि अजिंक्य रहाणे रेल्वे ग्राऊंड आणि डोंबिवली जिमखाना इथे एकत्र क्रिकेट खेळायचे.. तेव्हाचाच एक फोटो मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने शेअर केला आहे.
सौरभने पोस्टमध्ये डोंबिवलीतील क्रिकेटच्या दिवसांच्या आठवणीही शेअर केल्या आहेत. तो लिहितो, “आपण रेल्वे ग्राउंड आणि त्यानंतर डोंबिवली जिमखाना येथे एकत्र क्रिकेट खेळलो. खातू सर आणि तांडेल सरांकडून शिकण्याची संधी आपल्याला मिळाली. तू लहान असतानाही नेहमी मोठ्या खेळाडूंच्या नेटमध्ये सराव करायचास. तुला गोलंदाजी करायला त्यांनाही खूप मजा यायची, कारण तू जवळपास प्रत्येक चेंडू बॅटने सीमारेषेबाहेर भिरकावून लावायचास.”
सौरभने पुढे अजिंक्यच्या लहानपणीच्या क्रिकेट कौशल्याच्या आठवणी सांगताना लिहिलं, “आम्हाला नेहमी सांगितलं जायचं, ‘अजिंक्याकडे बघा, तो कसा खेळतोय… त्याचं निरीक्षण करा.’ मी मात्र अजिबात चांगला खेळायचो नाही.”
तो पुढे म्हणतो, “क्लब किंवा राज्यस्तरीय सामने असायचे, तेव्हा तू अवघा १४ वर्षांचा होतास. पण अंडर-१४ ऐवजी कायम अंडर-१९ संघातून खेळायचास. तुझ्या प्रत्येक सामन्याला तुझे बाबा आवर्जून उपस्थित असायचे. त्यावेळीच तुझ्यातील मोठा क्रिकेटपटू आम्हा सगळ्यांना दिसू लागला होता.”
सौरभने पोस्टच्या शेवटी अजिंक्य रहाणेच्या यशाचा प्रवास आठवत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो लिहितो, “मला आठवतंय, २०११ मध्ये जेव्हा तू भारतीय संघाकडून पदार्पण केलंस, तेव्हा मीही २३ वर्षांचा होतो आणि तूही. पहिल्यांदा तुझं नाव भारतीय संघात आलं तेव्हा मला आणि विशेषतः माझ्या आई-वडिलांना खूप अभिमान वाटला. तेव्हाच आईने अगदी टिपिकल शैलीत मला म्हटलं होतं, ‘बघ तो कुठे पोहोचला… आणि तू!'”
पुढे तो म्हणतो, “आज तुझा निवृत्तीचा व्हिडीओ पाहिला आणि डोळे पाणावले. विशेषतः जेव्हा तू डोंबिवलीचं नाव घेतलंस. शून्यातून आलेल्या एका मराठी मुलाने स्वतःच्या मेहनतीने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे, अजिंक्य. तू भारतासाठी खेळलेली प्रत्येक खेळी अविस्मरणीय आहे. प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान आहे… आणि मला एक डोंबिवलीकर म्हणून सगळ्यांपेक्षा थोडा जास्त अभिमान आहे!”
सौरभ चौघुलेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्यावर प्रतिक्रिया देत अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला सलाम केला आहे.
Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता






