( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Friendship Day Special : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…’ हे ‘शोले’ चित्रपटातील गाणे आजही मैत्रीचे प्रतीक मानले जाते. बॉलिवूडमध्ये मैत्रीचे नाते विविध पैलूंनी उलगडणारे अनेक चित्रपट आले आहेत. हे चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर आयुष्य, नाती आणि मित्रांचे महत्त्वही अधोरेखित करतात.
‘3 इडियट्स’
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ हा चित्रपट तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या मैत्रीची कथा सांगतो. रांचो, राजू आणि फरहान यांच्या माध्यमातून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजाच्या चौकटीबाहेर विचार करण्याचा संदेश दिला जातो. मित्रांचा पाठिंबा आयुष्य कसे बदलू शकतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवले आहे.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’
झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात तीन मित्र स्पेनच्या रोड ट्रिपवर जातात. या प्रवासात ते भीतीवर मात करतात, आयुष्याचा आनंद घेण्याचे धडे शिकतात आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट होते. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या अभिनयाने हा चित्रपट खास ठरला.
‘ये जवानी है दीवानी’
अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्या मैत्रीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तरुणाई, स्वप्ने, प्रेम आणि मैत्री यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो.
‘दिल चाहता है’
फरहान अख्तर यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट भारतीय सिनेमातील मैत्रीवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. आकाश, समीर आणि सिद्धार्थ या तीन मित्रांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि त्यांच्या नात्यातील बदल अत्यंत वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आले आहेत.
सुशांत सिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तीन मित्रांची स्वप्ने, संघर्ष आणि गुजरातमधील सामाजिक-राजकीय घडामोडींचा त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम दाखवण्यात आला आहे. संकटातही मैत्री कशी टिकते, हे चित्रपट अधोरेखित करतो.
‘रंग दे बसंती’
आमिर खान, आर. माधवन, सिद्धार्थ, शर्मन जोशी, कुणाल कपूर आणि अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मैत्रीबरोबरच देशभक्तीची भावना जागवतो. मित्रांचा एक गट अन्यायाविरोधात उभा राहतो आणि समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.
मैत्रीचे नाते, विश्वास, त्याग, प्रेरणा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन देणारे हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. फ्रेंडशिप डे निमित्त हे चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी नक्कीच दवडू नका.






