( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या जोड्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. काही जोड्या त्यांच्या अभिनयामुळे लक्षात राहतात, तर काहींची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. आता अशाच एका नव्या जोडीची चर्चा रंगली आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील हे दोघे आगामी ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेनंतर आणि त्यातील गाणी-टीझर प्रदर्शित झाल्यापासून या जोडीबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.
रोमँटिक आणि हलक्याफुलक्या कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटात दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावरही या फ्रेश पेअरिंगची चर्चा सुरू असून, अनेकांनी या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील ताज्या आणि आकर्षक जोड्यांपैकी एक मानलं आहे.
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधानने आतापर्यंत विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, सायली पाटीलनेही आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि पडद्यावरील उपस्थितीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर काय जादू दाखवते, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना भूषण प्रधानने सांगितलं की, सायलीसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी होता. पहिल्याच चित्रपटात दोघांचं ट्यूनिंग उत्तम जुळलं आणि त्यामुळे पडद्यावर दिसणारी केमिस्ट्री अधिक नैसर्गिक झाली. प्रेक्षकांना ही जोडी निश्चितच आवडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
सायली पाटीलनेही भूषणसोबतच्या कामाचा अनुभव शेअर करताना सांगितलं की, त्याच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. ही जोडी पूर्णपणे नवी असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल वेगळीच उत्सुकता आहे आणि हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी आशा तिने व्यक्त केली.
‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट आजच्या तरुणांच्या नातेसंबंधांभोवती फिरणारा आहे. योग्य जोडीदाराचा शोध, प्रेमातील गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे मनोरंजक प्रसंग यांची रंजक मांडणी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केले असून, निर्मिती सतीश महादेव गेजगे यांची आहे.
भूषण प्रधान आणि सायली पाटील यांच्या नव्या जोडीची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता २४ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन जोडी, रोमँटिक कथानक आणि ताज्या मांडणीमुळे ‘स्वप्नसुंदरी’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.






