(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Saawan Aaya Hai Song: पाऊस आणि प्रेम यांचं नातं हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच खास राहिलं आहे. पडद्यावर या दोन्ही भावनांचा सुंदर संगम साकारण्यात दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांचा हातखंडा आहे. ‘हम आपके हैं कौन..!’मधील ‘ये मौसम का जादू है मितवा’ असो किंवा ‘हम साथ साथ हैं’मधील ‘म्हारे हिवड़ा में नाचे मोर’ गाण्यातील पावसाळी दृश्यं, त्यांच्या चित्रपटांमधील संगीत आणि प्रेमाला नेहमीच विशेष स्थान मिळालं आहे. आता आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटातील ‘सावन आया है’ या नव्या गाण्यातून सूरज बडजात्या पुन्हा एकदा प्रेम आणि पावसाची जादू प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.
आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘सावन आया है’ हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर फुलणाऱ्या प्रेमाची सुंदर अनुभूती देतं. गाण्यात दोघेही पावसात एकमेकांसोबत खास क्षण घालवताना दिसतात. त्यांच्या नजरा, हलकंसं हास्य आणि एकमेकांबद्दलचं आकर्षण जुन्या हिंदी चित्रपटांमधील रोमँटिक शैलीची आठवण करून देतं. शब्दांपेक्षा नजरेतून आणि छोट्या छोट्या क्षणांतून प्रेम व्यक्त करण्याची खासियत या गाण्यात पाहायला मिळते.
दिवाळीच्या आठवड्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या गाण्यात सणाची तयारी आणि घराची साफसफाई करताना एकत्र येणाऱ्या कुटुंबाचा आनंदही दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रोमँटिक क्षणांसोबतच कौटुंबिक वातावरणाची झलकही गाण्यात अनुभवायला मिळते.
श्रेया घोषालच्या आवाजाला हिमेश रेशमियांच्या संगीताची साथ
या गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं असून, श्रेया घोषाल आणि केशव आनंद यांनी ते गायलं आहे. गाण्याचे बोल मयूर पुरी यांनी लिहिले आहेत. श्रेया घोषाल यांचा भावपूर्ण आवाज आणि हिमेश रेशमिया यांचं मधुर संगीत यांचा सुरेख मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार रोमँटिक गाण्यांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या पुन्हा एकदा आपल्या खास कौटुंबिक आणि रोमँटिक शैलीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळी आयुष्मान खुराना आणि शर्वरी ही नवी जोडी त्यांच्या प्रेमकथेची झलक मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात गीता अग्रवाल शर्मा, कृष राव आणि अश्नूर कौर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.






