फोटो सौजन्य AI
चोरीचे ऑईल महामार्गावरून जाणाऱ्या टँकरचालकांना विकले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत.
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. याचदरम्यान पोलिसांना या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या एमजी हेक्टर वाहनाचा वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
वडोदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध सुरू केला. शुक्रवारी नागपूरमधील पाटणकर चौक येथे एमएच ०५/ईक्यू-९२८२ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडवले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रमणदासिंग अमृतसिंग रणधावा (४०) आणि कमल रामस्वरूप शर्मा (५५) हे दोघे आढळून आले. दोघेही नागपूरमधील बाबादीप नगर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरी केल्याची कबुली दिली.
वडोदा आणि मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी चोरीचे प्रकार केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
आरोपी ट्रान्सफॉर्मरमधून चोरी केलेले ऑईल महामार्गावरून ये-जा करणाऱ्या टँकरचालकांना विकत असल्याची माहिती चौकशीत मिळाली. या व्यवहारातून मिळालेली रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचे एमजी हेक्टर वाहन, २० हजार रुपये किमतीचे दोन अँड्रॉइड मोबाईल आणि ऑईल विक्रीतून मिळालेले १ लाख ५५ हजार रुपये रोख असा एकूण २१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.






