गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या तुलनेत गोवा हे लहान राज्य असले तरी दोन्ही राज्यांचे राजकीय चरित्र सारखेच आहे. राजकीय निष्ठा, विचार, भूमिका याचा ताळतंत्र सोडून लोक सर्रास इकडून तिकडे उडय़ा मारीत आहेत. हिंदी पट्टय़ांत आयाराम-गयारामांचे प्रताप दिसू लागले आहेत. तसे गोव्याच्या निवडणुकीत आलेमाव-गेलेमावचे युग गेल्या काही काळापासून सुरू झाले आहे.
गोव्यासारख्या एकेकाळच्या सत्त्वशील राजकारणाची सूत्रे आता मूठभर प्रस्थापित जमीन माफिया, ड्रग्जचे व्यापारी, दलाल मंडळींच्या हाती गेल्याने तेथील सामान्य माणसाची अवस्था चिंताजनक झाली आहे. गोव्यातील सर्वच राजकीय पक्ष या स्थितीस जबाबदार आहेत. भारतीय जनता पक्षाने गोव्यातील 34 उमेदवारांची यादी जाहीर करताच त्या पक्षातही बंडखोरीचे फटाके फुटू लागले.
भाजपने जे पेरले तेच उगवले. त्यामुळे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस तरी काय करणार? माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कापल्याने या सगळ्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले. पक्षशिस्त, मोदी-शहांचे भय, ईडी वगैरेचे भय न बाळगता भाजपमध्ये बंडाळीची लाट उसळली आहे. अर्थात गोव्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत ते उत्पल पर्रीकर.
मनोहर पर्रीकरांच्या या पुत्रास भाजपने उमेदवारी नाकारली आहे व उत्पलसुद्धा बंडाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. उत्पल पर्रीकर यांचे कर्तृत्व काय व भाजपमध्ये घराणेशाहीच्या निकषांवर उमेदवाऱया मिळत नाहीत, असे प्रवचन यानिमित्त झोडण्यात आले तो म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. खुद्द पणजीत ज्या बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली, त्यांच्या पत्नीस बाजूच्या ताळगाव मतदारसंघांची उमेदवारी बहाल केली आहे.
दुसरे म्हणजे विश्वजित राणे यांना वाळपई मतदारसंघात उमेदवारी देताना त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना बाजूच्या पर्ये मतदारसंघातून उमेदवारी दिली.
गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे? उत्पल जिद्दीने मैदानात उतरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील. पण त्यांची लढाई भाजपच्या बेइमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नये!