फोटो सौजन्य - Social Media
ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोगांसाठीचे डॉ. बेडेकर हॉस्पिटल आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखे व दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ऑटो रोथफेल्ड लिखित ‘द वूमन ऑफ इंडिया’ या १९२० साली प्रकाशित झालेल्या महत्त्वपूर्ण ग्रंथासाठी ज्येष्ठ चित्रकार एम. व्ही. धुरंधर यांनी रेखाटलेल्या तत्कालीन भारतातील विविध प्रांत, व्यवसाय आणि वर्गातील स्त्रियांच्या वेशभूषांचे अप्रतिम चित्रण या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.
या ऐतिहासिक चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन १३ नोव्हेंबर रोजी डॉ. महेश बेडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. नायक यांच्यासह अनेक प्राध्यापक, विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महेश बेडेकर यांनी धुरंधर यांच्या चित्रकलेचा वारसा, कलात्मकता आणि या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश याबाबत उपस्थित विद्यार्थी व पाहुण्यांना मार्गदर्शन केले.
हे चित्रप्रदर्शन १३, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत जोशी बेडेकर कॉलेज (ठाणे कॉलेज) परिसरात सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनाचा उद्देश भारतातील स्त्रियांची शंभर वर्षांपूर्वीची जीवनशैली, वेशभूषा आणि सांस्कृतिक विविधता या कलादालनातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात “प्राचीन भारतातील स्त्रिया” या विषयावर सहा. प्राध्यापक अंकुर काणे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ऐतिहासिक संदर्भांसह समाज, परंपरा, कला आणि स्त्रीप्रतिमा यांच्या बदलत्या प्रवासाविषयी प्रकाश टाकणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
‘द वूमन ऑफ इंडिया’ या १९२० सालच्या दुर्मिळ ग्रंथाची मूळ प्रतदेखील प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. शतकभर जुन्या या चित्रसंग्रहामुळे आजच्या पिढीला भारतीय समाजातील स्त्रियांच्या सांस्कृतिक इतिहासाची अनमोल झलक मिळणार आहे. बेडेकर कुटुंबियांनी सर्व रसिक, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना या ऐतिहासिक व दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.






