छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना घातलं कठस्नान; १००० जवानांनी घेरलं, घनदाट जंगलात भीषण चकमक
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी ९ वाजता ही चकमक घडली. सायंकाळीही अधूनमधून गोळीबार सुरू होता. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे. या कारवाईत एक हजार सैनिक सहभागी आहेत. सैनिकांनी ५०-७० नक्षलवाद्यांना घेरल्याचे वृत्त आहे. आयजी पी. सुंदरराज या मोहीमेची स्वतः देखरेख करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ९ वाजता चकमक सुरू झाली. या ऑपरेशन्समध्ये विजापूर-सुकुमा येथील डीआरजी जवान, सीआरपीएफचे ५ वे कोब्रा युनीट, सीआरपीएफचे २२९ वे बटालियनचे जवान सहभागी आहेत.’ ‘प्राथमिक माहितीनुसार, चकमकीत १२ नक्षलवादी मारले गेले. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलांचे कोणतंही नुकसान झालेले नाही.
यासह, या महिन्यात आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. १२ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यातील मद्दीद पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच माओवादी ठार झाले होते. गेल्या वर्षी, राज्यात विविध चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवाद्यांना ठार केलं. ६ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये आयईडीने एक वाहन उडवून दिले होते. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते.
दरम्यान, विजापूरमधील दुसऱ्या एका घटनेत, नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ २२९ आणि कोब्रा यांचे संयुक्त पथक कॅम्प पुटकेल येथून मोहिमेवर निघाले असताना माओवाद्यांनी लावलेल्या प्रेशर आयईडीच्या स्फोटात दोन जवान जखमी झाले. जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
येरवडा परिसरात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने येरवड्यात छापा कारवाईकरून मोठा ड्रग्जसाठा पकडला. पुणे पोलिसांनी तब्बल एकाकडून २२ लाखांचे मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. दरम्यान, शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अहमद वाहिद खान (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरीक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु, ड्रग्ज डिलर छुप्या पद्धतीने त्याची विक्री करत आहेत. तर दुसरीकडे पिणाऱ्यांना ड्रग्ज सहजरित्या उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ड्रग्ज पुरवठादारांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक दोन येरवडा परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना अहमद याच्याबाबत माहिती मिळाली. त्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानूसार, पथकाने छापा कारवाईकरून अहमद खान याला पकडले. त्याच्याकडे चौकशीकरून पोलिसांनी तब्बल २२ लाखांचे ११० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. पोलीस त्याच्याकडे आता हे एमडी कोठून आणले आणि पुण्यात तो कोणाला विक्री करत होता, याबाबत सखोल तपास करत आहेत.