कोलिहान खाणीमध्ये लिफ्ट कोसळून दुर्घटना; 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

कोलिहान खाणीमध्ये (Kolihan Mine Accident) लिफ्ट कोसळून अडकलेल्या 15 पैकी 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. तर जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 13 तासांपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

    झुंझुनू : कोलिहान खाणीमध्ये (Kolihan Mine Accident) लिफ्ट कोसळून अडकलेल्या 15 पैकी 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. तर जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 13 तासांपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर लिफ्टमध्ये अडकलेल्या 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

    उपेंद्र पांडे असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आता खाणीत अडकलेल्या अनेक मजुरांना बाहेर काढण्यात येणार आहे. मंगळवारी कोलकात्याचे दक्षता पथक हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत आले होते. खेत्री कॉपर कॉर्पोरशनचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. खाणीतील कामाची पाहणी केल्यानंतर मंगळवारी रात्री हे सर्वजण लिफ्टमधून वर येत होते. त्यावेळी अचानक लिफ्टची साखळी तुटली आणि लिफ्ट 1800 फूट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये 15 अधिकारी अडकले होते. ते सर्वजण लिफ्टसोबत खाली पडले.

    यामधील अनेक जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. 10 तासांच्या प्रयत्नांनंतर 3 अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर 13 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. पण गंभीर जखमी झालेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.