अवयवदानातही महिलाच पुरुषांपेक्षा ‘एक पाऊल पुढे’; भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला

अवयवदान करण्याचे अनेकदा आवाहन केले जाते. त्यासाठी जनजागृतीही होत असते. पण भारतात अवदान (Organ Donors) मोठ्या प्रमाणात होत नसले तरीही यामध्ये महिलाच पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे एका अभ्यासातून दिसत आहे.

    नवी दिल्ली : अवयवदान करण्याचे अनेकदा आवाहन केले जाते. त्यासाठी जनजागृतीही होत असते. पण भारतात अवदान (Organ Donors) मोठ्या प्रमाणात होत नसले तरीही यामध्ये महिलाच पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे एका अभ्यासातून दिसत आहे. कारण, भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला असल्याचे समोर आले आहे.

    भारतात अवयव प्रत्यारोपण होणाऱ्या प्रत्येकी पाच रुग्णांमध्ये चार पुरुष तर, एक महिला असते. 1995 ते 2021 दरम्यान भारतात एकूण 36 हजार 640 अवयव प्रत्यारोपण झाले आहेत. त्यापैकी 29 हजार पुरुष होते. तर सहा हजार 945 महिला होत्या, असेही या अभ्यासात समोर आले आहे. ज्यांचे अवयव रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मेंदूमृत पुरुषदात्यांची संख्या अधिक असली तरी जीवंत दात्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती.

    अनेक सरकारी रुग्णालयांमधील जीवंत दाते अर्थात डोनर आणि जोडीदाराला अवयव दान करण्यासंदर्भातील माहिती पाहिल्यास त्यातील 90 टक्क्यांहून अधिक या रुग्णाच्या पत्नी असतात. तर यामध्ये केवळ 10 टक्के हे पती असल्याचे समोर आले आहे. पालकांच्या एकूण अवयवदात्यांचे प्रमाण पाहिल्यास जीवंत दात्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक महिला या आई असल्याचे आढळले आहे.

    भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला

    2019 मधील अवयव प्रत्यारोपणाच्या माहितीचा अभ्यासही करण्यात आला. त्यामध्ये असे आढळून आले की, अवयव देणाऱ्या एकूण जीवंत अवयवदात्यांपैकी 80 टक्के महिला होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पत्नी आणि आईचा समावेश होता. तर, अवयव घेणारे बहुतांश जण पुरुष होते.