धाराशिवच्या माविमचा राज्यात दुसरा क्रमांक, बचतगटांच्या बळावर महिलांची झेप
महिलांच्या सक्षमीकरणाचा मुख्य आधार ठरलेल्या बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक परिवर्तन घडवून आणण्यात माविमने मोठी भूमिका बजावली आहे. कुक्कुटपालन शेळीपालन, दाळ मिल, हळद लागवड व प्रक्रिया यांसारख्या समान व्यवसायांच्या उपप्रकल्पांमध्ये १०० टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक लोकसंचालीत साधन केंद्राअंतर्गत किमान तीन उपप्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
बचतगटांना आर्थिक बळ देण्यासाठी यंदा विक्रमी ३७ कोटी २१ लक्ष रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, जे मागील वर्षाच्या तुलनेत १० कोटींनी अधिक आहे. याचबरोबर व्हल्नरेबल सपोर्ट फंड अंतर्गत विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, घटस्फोटीत, निराधार, वंचित, भूमिहीन आणि अल्पभूधारक अशा ५१२ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ७६ लाख ८० हजारांची मदत देण्यात आली.
आरोग्य आणि पोषण क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत ६४ गावांतील सुमारे ४९६० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह थायरॉईड आणि बीएमआय तपासण्या करण्यात आल्या. तसेच ३००० पेक्षा अधिक महिलांना परसबाग लागवडीसाठी बियाणे वाटप करण्यात आले.
समाजात लिंगसमानतेची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘माविम मित्र मंडळ’ स्थापन करून ६० गावांतील पुरुषांना विविध सामाजिक विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये स्त्री-पुरुष समानता, महिलांचे संपत्ती हक्क, संयुक्त मालकी हक्क, बालविवाह प्रतिबंधक कायदा आदी विषयांचा समावेश होता. तसेच वातावरणीय बदल या विषयावरही माविम कर्मचारी, माविम मित्र आणि समुदाय साधन व्यक्ती यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा ठिकाणी महिला मेळावे आणि सर्वसाधारण सभा घेऊन शासकीय योजनांची माहिती ८०० ते १००० महिलांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच २३८ नवीन बचतगट स्थापन करून ९२ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनातून सुमारे ८ लक्ष २९ रुपयांची विक्री झाली.
२०२५-२६ मध्ये जिल्ह्यात तीन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ‘लाडकी बहिण’ महिला सहकारी पतसंस्था स्थापन करून सुरू करण्यात आल्या, ज्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळाले आहे. गेल्या २९ वर्षांत बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे दरडोई उत्पन्न वाढले असून बचत गटातील काही महिलांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पीएसआय, इंजिनिअर, वकील, डॉक्टर, शिक्षक, पोलीस व सैन्य अशा विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे.
याचबरोबर बालविवाह निर्मूलन, हुंडाबंदी, दारूबंदी, कुपोषण निर्मूलन, वृक्षारोपण आणि महिला ग्रामसभा यांसारखे सामाजिक उपक्रमही प्रभावीपणे राबवले जात आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असून गेल्या ५१ वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. उमरगा, तुळजापूर, धाराशिव, कळंब व परंडा तालुक्यातील गरजू महिलांनी माविमच्या विविध योजनांचा लाभ घेऊन बचतगट स्थापन करून स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहन माविमच्या जिल्हा कार्यालयाने केले आहे.
Romance Scam: डॉक्टर, वकील, प्रेमिका…! ५०० हून अधिक महिला ‘रोमांस स्कॅम’चे बळी, असं गुपित झाले उघड






