विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, 40 मासेमारी नौका जळून खाक!

विशाखापट्टणममधील एका बंदरात काल रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुमारे 40 मासेमारी नौका जळून खाक झाल्या.

    आंध्रप्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. विशाखापट्टणममध्ये बंदरात भीषण आग (Visakhapatnam Boat Fire) लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुमारे 40 मासेमारी नौका जळून खाक झाल्या. काही गुन्हेगारांनी बोटींना आग लावल्याचा मच्छीमारांचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेत सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    40 बोटींमध्ये पसरली आग

    रविवारी रात्रीच्या सुमारास विशाखापट्टणमच्या मासेमारी बंदरात भीषण आग लागली. पहिल्या बोटीपासून सुरू झालेली ही आग अखेर 40 बोटींमध्ये पसरली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    या प्रकरणाची अधिक माहिती देताना डीसीपी आनंद रेड्डी यांनी सांगितले की, सुरुवातीला मासेमारी बंदरावर उभ्या असलेल्या बोटीला आग लागली आणि नंतर मध्यरात्री इतर फायबर बोटींमध्ये पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    ते पुढे म्हणाले की, सध्या आग आता आटोक्यात आली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.