भारत गौरव ट्रेनमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा,​ पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर केले उपचार

चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव ट्रेनमध्ये विषबाधा होऊन प्रवासी बळी पडल्याची बातमी आहे. सुमारे 40 प्रवाशांची प्रकृती खालावली. यानंतर सर्वांवर पुणे रेल्वे स्थानकावर उपचार करण्यात आले.

    पुणे :  भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि चविष्ट अन्न पुरवण्यात येत  असा किती जरी दावा केला जात असला तरी नुकतंच रेल्वे प्रवासात दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना सध्या घडली आहे. चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव ट्रेनमधील (Chennai Pune Bharat Gaurav Train) सुमारे ४० प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचल्यानंतर स्टेशनवर सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. या सर्व प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेतील अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. प्रवाशांनी ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मध्यरात्री जेव्हा गाडी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर तात्काळ ससून रुग्णालयाचे कर्मचारी आणि डॉक्टर उपचारासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. ४० प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.

    सध्या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे. पण, हे सर्वजण विषबाधेचे बळी ठरल्याचा संशय आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन अधिक तपास करत आहे.