खटाव तालुक्यातील वरुड येथे राज्य शासनाच्या वतीने आणि महसूल विभागाच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, जमिनीचे उतारे आणि प्रलंबित महसूल कामांचा लाभ घरबसल्या मिळाला.
प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाई माने यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ मंदिर परिसरात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या शिबिरात सक्रिय होती. निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड, कृषी अधिकारी वैभव सोळंके, भोसरे मंडल अधिकारी दिलशाद मुल्ला यांच्यासह महसूल, पुरवठा आणि कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा
याप्रसंगी वरुड, लोणी, कुमठे, अंभेरी, कोकराळे, गोसाव्याची वाडी आणि गादेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात केवळ अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तर प्रत्यक्ष कामांचा निपटाराही करण्यात आला. ७/१२ वरील चुका दुरुस्त करणे (कलम १५५), लक्ष्मी मुक्ती योजना, वारस नोंदी आणि विविध शेरे कमी करण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे, मोकळ्या केलेल्या पांदण रस्त्यांची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेऊन त्याचे तातडीने वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब सूर्यवंशी यांनी केले, प्रास्ताविक दत्तात्रय घाडगे यांनी मांडले, तर पोलीस पाटील फडतरे (कुमठे) यांनी उपस्थितांचे आभार मानले. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.






