नवी दिल्ली : ‘मॅट्रोमनी साईट’वरून (Matrimony Website) संपर्क साधून 22 तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पायधुनी पोलिसांनी (मुंबई) हैदराबाद येथून अटक केली. आरोपीने फसवणूक करण्याच्या हेतूने सात तरुणींशी लग्न केल्याचे चौकशीत कबूल केले आहे. त्यातील काहींवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचाही संशय आहे.
इम्रान अली खान असे या भामट्याचे नाव आहे. इम्रान अली खान हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून, त्याने मुंबई, धुळे, सोलापूर, परभणी, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींना फसवलं आहे. सात तरुणींशी लग्न करून त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले आहेत. एका 42 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पायधुनी पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला हैदराबादमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलीस चौकशीत त्याने सात लग्न केल्याचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळ्याचे कबुल केले आहे.
तक्रारदार महिलेने 2023 मध्ये ‘मॅट्रोमनी साईट’वर स्वतःची माहिती दिली होती. त्यानंतर संकेतस्थळाकडून काही मुलांची माहिती महिलेला देण्यात आली होती. त्यात हैदराबाद येथील इम्रान अली खान याचीही माहिती तिला देण्यात आली होती. तक्रारदार महिलेने इम्रानशी संपर्क साधला असता त्याने आपण बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. याच दरम्यान त्याने या महिलेकडे पैशांची मागणी करत फसवणूक केली.






