लखनौ : ‘आदिपुरुष’ या (Adipurush Movie) ओम राऊत दिग्दर्शित सिनेमात प्रभू राम, सीता आणि हनुमान यांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) न्यायमूर्तींनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. एकदा कुराणाबाबत चुकीची डॉक्युमेंट्री करुन तर बघा, म्हणजे तुम्हाला परिणाम कळतील. हे प्रकरण रामायणाशी संबंधित असलं, तरी हायकोर्टाला सर्वधर्म समान असेल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
कोणत्याही धर्माला चुकीच्या पद्धतीनं दाखवणं अमान्य
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि श्रीप्रकाश सिंह यांच्यासमोर आली. दोन्ही न्यायमूर्तींनी कोणत्याही धर्माचं चुकीचं सादरीकरण अमान्य असल्याचं स्पष्ट केलंय. कोणताही धर्म असो, त्याचा सन्मान राखलाच जायला हवा, असंही त्यांनी सांगितलंय. कोणत्याही धर्माशी संबंधित असलेल्या बाबी या चुकीच्या पद्धतीनं सादर व्हायला नकोत, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. कोर्टाचा कोणताही धर्म नसतो, मात्र देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी कोर्टाला घ्यायची असते, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
पहिल्यांदाच हिंदू देवतांचा अपमान नाही
हिंदू देव देवतांचा अपमान यापूर्वीही अनेकदा झाल्याचं न्यायमूर्ती म्हणालेत. सिनेमा निर्मितीत असलेले पैसे कमवण्यासाठी काहीही दाखवण्यास तयार असल्याचं मतही कोर्टानं व्यक्त केलंय. आदिपुरुष प्रकरणात कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, जे आहेत ते केवळ मौखिक तोंडी स्वरुपाचे आहेत, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला परवानगी दिलीच कशी?
डेप्युटी एडव्होकेट जनरल बीएस पांडे यांना न्यायमूर्तींनी विचारणा केली की, या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं परवानगी दिलीच कशी? बोर्डात असलेल्या व्यक्ती या संवेदनशील आहेत, त्यांनी विचार करुनच परवानगी दिली असेल, असं पांडे यांनी सांगितलं. त्यावर न्यायमूर्तींनी संस्कारी लोकांनी सिनेमाला परवानगी दिली का, असा कुत्सित सवाल केलाय. रामायणाबाबत असा निर्णय घेणारे धन्य आहेत, असंही न्यायमूर्ती म्हणालेत. आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊत याच्यावरही कोर्टानं जोरदार टिप्पणी केली आहे. त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं, म्हणून त्यांनी रामायण या पद्धतीनं दाखवलं, असा सवाल कोर्टानं केलाय.