Photo Credit-Social Media
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एग्जिट पोलमध्ये ‘आप’ला धक्का बसला असला तरी पक्षाने मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ‘आप’ 50 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणार आहे आणि सरकार स्थापन करणार आहे.’आप’च्या अंतर्गत अहवालानुसार, पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील. एवढेच नाही तर, गोपाल राय यांचा दावा आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत7-8 जागांवर जवळची लढत दिसून येते, म्हणजेच ‘आप’ला येथेही यश मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वेळी पक्षाने दिल्लीत 67 जागा जिंकल्या होत्या.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर गोपाल राय म्हणाले, “एग्जिट पोलच्या माध्यमातून चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप ऑपरेशन लोटसच्या मदतीने विजय मिळवू इच्छित आहे. मात्र, आमचे सर्व उमेदवार मतमोजणीची तयारी करत आहेत. आम्ही सरकार बनवणार आहोत. उद्या भाजपची खरी परिस्थिती स्पष्ट होईल.”
दिल्लीतील बहुतांश एग्जिट पोल भाजपला विजय मिळेल, असे दर्शवत आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीत पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचे ग्राउंड रिपोर्ट सादर केले. शनिवारी मतमोजणीपूर्वी सर्व पक्षाच्या उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीत, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करण्यास तयार आहे. ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी ‘एक्झिट पोल’चा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बैठकीनंतर बोलताना राय म्हणाले, “केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व उमेदवारांनी त्यांचे ग्राउंड रिपोर्ट सादर केले, जे सूचित करतात की ‘आप’ ५० हून अधिक जागांवर निर्णायक विजय नोंदवणार आहे, तर सात-आठ जागांवर कठीण लढत आहे.” राय यांनी असाही दावा केला की विरोधी पक्ष ‘एक्झिट पोल’ वापरून चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच दिल्लीच्या सत्तेवर कोण येणार? ‘आप’ पुन्हा एकदा विजय मिळवणार का? की भाजपला ऐतिहासिक यश मिळणार? हे स्पष्ट होईल.






