फोटो सौैजन्य: गुगल
अहमदाबाद ते लंडन विमान अपघात दुर्घटनेत अनेकांनी नाहक जीव गमावला आहे. विमानातील पायलट आणि इतर सहकार्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र हाती यश आलं नाही. याच सगळ्या दुर्देवी घटनेत उरण तालुक्यातील न्हावा गावातील रहिवासी आणि विमान सौंदर्यवती मैथिली मोरेश्वर पाटील ही देखील 12 जून रोजी दुपारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया एआय 171 विमान अपघाताची बळी ठरली.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी गगनाला भिडलेल्या मैथिलीच्या निधनामुळे पाटील कुटुंबियांवर तीव्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आज, त्यांच्या मुलीच्या रूपात कुटुंबाचा एकमेव आधार गमावल्याने संपूर्ण पाटील कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आई, वडील, बहीण आणि भावाला हे कधीच माहीत नव्हते की एके दिवशी आकाशात उडणाऱ्या त्यांच्या मोठ्या बहिणीला हे आकाशच गिळंकृत करेल, अशा शब्दात मैथिलीचे वडिल मोरेश्वर पाटिल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मैथिलीची स्वप्ने आकाशाला भिडणारी होती. दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक ध्येय साध्य करणारी मैथिली जितकी मेहनती होती तितकीच ती आध्यात्मिक आणि धार्मिक ही होती. विमान प्रवासादरम्यान, मैथिली नेहमीच तिच्यासोबत भगवद्गीता, जपमाळ आणि बाल गोपाळांची मूर्ती घेऊन जात असे. या विमान अपघातात 270 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात लागलेल्या आगीत लोखंडही वितळले. पण अपघातस्थळी सापडलेल्या भगवद्गीतेवर एकही ओरखडा नव्हता. अशा परिस्थितीत, ती भगवद्गीता मैथिलीची होती का, हा एक मोठा प्रश्न आहे.
गरिबी आणि हलाखी च्या परिस्थितित आपल्या मुलीला चांगले प्रशिक्षण आणि शिक्षण देणारे आणि सक्षम बनवणारे मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील संपूर्ण विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत. अपघाताला तीन दिवस उलटून गेले तरी, स्थानिक नेते वगलता राज्याच्या कोणत्याही मंत्र्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही. कुटुंबाचा सर्वात मोठा आधार हरपल्याने सरकार दरबारी मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.