संग्रहित फोटो
भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातासारखा (Balasore Railway Accident) आणखी एक मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. ही घटना शनिवारी भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर (Manjuri Road Station) घडली. येथे इंटरलॉकमध्ये (Interlocking System) एक मोठा दगड अडकला होता. मात्र, सुदैवाने हा दगड रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला व त्याने तो तातडीने काढल्याने पुढील अनर्थ टळला.
या रेल्वे ट्रॅकच्या येथून रेल्वे गेली असती तर ओडिशामध्ये आणखी एक मोठा रेल्वे अपघात घडला असता. कारण हा दगड रेल्वेला ट्रॅकवरून उतरवण्यास पुरेसा होता, असे सूत्रांनी सांगितले. येथील रूप्सा रेल्वे स्थानकावर आणखी एक रेल्वे दुर्घटना होता होता टळली. येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीच्या बोगीतून धूर निघताना दिसला.
यानंतर त्याने लगेचच बालासोर अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवली. मात्र, कोळसा भरलेल्या मालगाडीला आग कशी लागली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
275 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू
ओडिशात झालेल्या तीन रेल्वेंच्या दुर्घटनेत सुमारे 275 पेक्षा जास्त प्रवाशांचा बळी गेलाय. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताची कसून चौकशी सुरु होत आहे. त्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी बालासोर येथे पोहोचले आहेत. त्यांच्याकडून तपास केला जात आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुर्घटना होता होता टळली.