अरुणाचल प्रदेशात तब्बल 60 किलोमीटरपर्यंत चीनची घुसखोरी? केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा मोठा खुलासा
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामरिक चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनने अरुणाचल प्रदेशात तब्बल 60 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हा दावा फेटाळून लावत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, सीमावर्ती भागातील गावांमधील नागरिकांच्या समस्या आणि चिंता वास्तविक आहेत. मात्र, त्याचा अर्थ चीनने भारतीय गावांवर किंवा भारतीय भूभागावर 60 किलोमीटरपर्यंत कब्जा केला असा होत नाही. भारत आणि चीनमधील सीमेचे अनेक भाग अद्याप जमिनीवर स्पष्टपणे सीमांकित झालेले नसल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद आणि तणाव निर्माण होतो.
सीमावर्ती गावांची भौगोलिक परिस्थितीही या समस्येचे एक कारण असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. उंच डोंगराळ भागात वस्ती कमी असून बहुतांश गावे दऱ्या किंवा तुलनेने खालच्या भागात आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या पारंपरिक जमिनी आणि प्रत्यक्ष सीमारेषा याबाबत प्रश्न निर्माण होतात.
‘E-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान’; केंद्रातील बड्या सरकारी अधिकाऱ्याने केले मान्य
दरम्यान, चीनने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्याचे रिजिजू यांनी मान्य केले. चीनकडून रस्ते, महामार्ग आणि इतर सुविधा विकसित केल्या जात आहेत. दुसरीकडे, पूर्वी भारताने सीमा भागात रस्ते बांधण्याबाबत वेगळे धोरण स्वीकारले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी संसदेत सीमा भागात रस्ते बांधण्यासंदर्भात सरकारची भूमिका मांडली होती.
रिजिजू यांनी स्पष्ट केले की, चीनकडून पायाभूत सुविधा उभारल्या जात असतील तर भारतालाही आपल्या सीमावर्ती भागात विकासकामे करण्याचा अधिकार आहे. मात्र, या परिस्थितीचा थेट अर्थ चीनने भारतीय गावांवर कब्जा केला असा काढणे योग्य ठरणार नाही.
भारत अरुणाचल प्रदेशला देशाचा अविभाज्य भाग मानतो. भारत-चीनदरम्यान अरुणाचल प्रदेशाच्या भागात सुमारे 1,126 किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील विकास, सीमांकन आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.






