नवी दिल्ली – गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. शनिवारी गांधीनगर येथील कमलम कार्यालयात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांच्या पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा निरीक्षक म्हणून उपस्थित होते. भूपेंद्र पटेल आजच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
शुक्रवारी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राज्यात नवीन सरकार स्थापनेपूर्वी औपचारिकपणे राजीनामा दिला. भूपेंद्र पटेल १२ डिसेंबर रोजी गांधीनगर येथील हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे गुजरातमधील विधानसभेच्या १८२ पैकी १५६ जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड ही केवळ औपचारिकता होती, कारण पक्षाने निवडणुकीपूर्वीच पटेल यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गुरुवारीच पटेल पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची पुष्टी केली होती. त्यांनी जाहीर केले होते की १२ डिसेंबर रोजी पटेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.