 
        
            बिग बॉसची फेम अर्चना गौतमच्या (Archana Gautam) वडिलांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचे पीए संदीप सिंह (Sandeep Singh) यांच्याविरोधात  तक्रार (FIR) दाखल केली आहे. अर्चना गौतमच्या वडिलांनी संदीप सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी अर्चनाला जीवे मारण्याची धमकी दिली. संदीप सिंह यांनी अर्चनासोबत बोलताना काही जातिवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप अर्चनाच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
अर्चना गौतमने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करुन संदीप सिंह यांनी तिच्यासोबत केलेल्या वर्तणुकीची माहिती दिली होती. त्यानंतर आता अर्चनाच्या वडिलांनी संदीप सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. मेरठ पोलिसांनी संदीप सिंह विरुद्ध कलम 504, 506 आणि एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
UP | FIR registered against Cong leader Priyanka Gandhi Vadra’s PA for allegedly threatening former Bigg Boss contestant& Congress leader Archana Gautam A case has been registered against Sandeep Singh on the complaint of Archana Gautam. Further probe underway: SP Meerut (07.03) pic.twitter.com/ugbWuGZQzd — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 7, 2023
काही दिवसांपूर्वी अर्चनानं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तिनं प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. तिनं सांगितलं होतं की, संदीप सिंह यांची वागणूक वाईट आहे, ते महिलांसोबत किंवा ज्येष्ठ व्यक्तींसोबत नीट बोलत नाहीत. ही काँग्रेस पक्षातील लोकांची तक्रार आहे. अर्चना गौतमनं 26 फेब्रुवारी 2023 रोजी रायपूर, छत्तीसगड येथे प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिनं फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला होता.
अर्चनानं काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडिया शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ‘मेरी दीदी मेरी प्रेरणा, जोपर्यंत मी जगत आहे, तोपर्यंत मी तुमचीच आहे.’ बिग बॉसच्या 16 सीझनमधून अर्चना प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. अर्चना ही बिग बॉस-16 च्या टॉप-5 स्पर्धकांपैकी एक होती.






