नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालानंतर देशभरात भाजप मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर आले आहे. या लोकसभेत भाजपला 240 जागा मिळाल्या तर एनडीएला एकूण 292 जागा आहेत. परंतु, भाजपपासून जर त्यांचे मित्रपक्ष दूर झाले तर भाजपला सत्तेचे गणित आखता येणार नाही. त्यामुळे भाजप काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. तत्पूर्वी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपने मित्रपक्षांसोबत बैठक घेत एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड केली आहे, तर राष्ट्रपतींची वेळसुद्धा मागून घेतली आहे. येत्या ७ जूनला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.
सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली
लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसंच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना ७ जूनची तारीख दिली आहे.
मोदींच्या नेतेपदाच्या निवडीच्या प्रस्तावात….
भारताच्या १४० कोटी देशवासियांनी गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळं देशाच्या प्रत्येक क्षेत्राला विकसित होताना पाहिलं आहे. बऱ्याच काळापासून सुमारे ६ दशकांनंतर भारताच्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं सशक्त नेतृत्वाची निवड केली आहे.
सर्वसंमतीनं आमचा नेता म्हणून निवड
आपल्या सर्वांना गर्व आहे की, २०२४ची लोकसभा निवडणूक एनडीएनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं लढली आणि जिंकली. आम्ही सर्वजण एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांना सर्वसंमतीनं आमचा नेता म्हणून निवड करतो.
पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध
मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारताच्या गरीब-महिला-तरुण-शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध आहे. भारताचा वारसा संरक्षित करुन देशाच्या सर्वांगिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम करत राहिल. हा प्रस्ताव ५ जून २०२४ ला नवी दिल्लीत मंजूर झाला आहे.
एनडीएच्या बैठकीनंतर ७ जून रोजी एनडीएचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींना त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी एनडीएचे प्रमुख नेते मिळून राष्ट्रपतींकडं सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे सर्वजण मिळून सत्तास्थापनेबाब चर्चा करणार आहेत.