File Photo : BJP
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. त्यानंतर आता भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीला वेग आला आहे. त्यानुसार, आता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी फेब्रुवारीच्या अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जोरदार हालचालीदेखील केल्या जात आहेत.
हेदेखील वाचा : महायुती सरकारच्या खातेवाटपाचं अखेर ठरलं?; ‘हा’ मोठा बदल केला जाणार
सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुकांतर्गत पक्षाच्या निम्म्याहून अधिक राज्य घटकांमधील मतदान प्रक्रिया जानेवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भाजपच्या जवळपास 60 टक्के प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपला आहे आणि पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा हे अध्यक्षपदी सध्या आहेत. मात्र, त्यांच्या पदाचा कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे. त्यामुळे आता भाजपला नवा अध्यक्ष लवकरच मिळणार आहे.
दरम्यान, के. लक्ष्मण यांची राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य नरेश बन्सल, लोकसभा सदस्य संबित पात्रा आणि पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेखा वर्मा संघटनेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहप्रभारी असतील. ही समिती राज्यस्तरावरून निवडणुकीला सुरुवात करणार आहे.
राष्ट्रीय समितीचे सदस्य करतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवड
तसेच जिल्हाध्यक्ष व प्रदेश समितीच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय समिती सदस्यांची निवड होणार आहे. प्रदेश समिती सदस्य प्रदेशाध्यक्षांची निवड करतील. त्याचबरोबर राष्ट्रीय समितीचे सदस्य राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील.
काय सांगतो भाजपचा नियम?
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी किमान निम्म्या राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी तरतूद भाजपच्या घटनेत आहे. आम्हाला आशा आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस भाजपचे नवे अध्यक्ष पदभार स्वीकारतील, असे पदाधिकाऱ्यानी सांगितले. भाजपाचा नवा अध्यक्ष सध्या केंद्रीय मंत्री म्हणून काम करीत असलेला कोणी असू शकतो का, असे विचारले असता ते म्हणाले की, ते सरकार किंवा संघटनेचे कोणीही असू शकते आणि अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.