महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम राजकारणावरून खासदार संजय राऊत यांनी डीसीएम एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाले आहेत. इक्बाल यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 39 मतं मिळाली. त्यामुळे सय्यद इक्बाल हे महापौर झाले असून काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. याबाबत ते म्हणाले की, “त्या एकनाथ शिंदे यांना सांगा जरा अभ्यास करा, डोक्याला तेल लावा थंड व्हा, त्यांना माहिती आहे का भाजपचे १२ नगरसेवक मुस्लिम आहेत. मुस्लिम काही घुसघोर नाहीत, आमचे तालुका प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत. तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत बरे. तुम्ही काय मुसलमानांना तिकीट दिले नाही का? एकनाथ शिंदे हे अक्षरशत्रू आहेत. भाजपला संधी मिळाली असती तर त्या १२ मधूनच एक मुस्लिम महापौर झाला असता,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का
पुढे ते म्हणाले की, “तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा, ज्यांनी ज्या ताटात खाल्लं, तिथेच तंगडी वर करणारे हे सगळे लोक… त्यापेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. परभणीचे जे महापौर झालेत ते तालुकाप्रमुख आहे आमचा. अनेक वर्ष तो माणूस पक्षाचं काम करतोय, झिजतोय, पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारंच,” अशी टीकाही खासदार संजय राऊतांनी केली.
“या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान होते, मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होते, उत्तर प्रदेश किंवा बिहारचे राज्यपाल मुस्लिम होते, या देशाचे राष्ट्रपाती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. डॉ. अब्दुल कलाम हेही मुस्लिम होते ना…!” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास






