वडील म्हणाले, स्वत: पैसे कमावून दाखव! पठ्ठ्याने यूट्यूबवर Video पाहून केला बँक लुटण्याचा प्लान
बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांने आपल्या पित्याचे टोमणे एवढे मनावर घेतले की त्याने चक्क बॅंकच लुटण्याचा प्लान केला. यासाठी त्याने युट्यूबवर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आणि एकट्याने बॅंक कशी फोडली याचे व्हिडिओ पाहून प्लान बनवला. यानंतर तो बॅंक लुटायला गेला पण त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला. बंदूक, चाकू आणि ब्लेड घेऊन हा तरुण बॅंक लुटायला गेला बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं आणि त्याचा सगळा डाव फसला. ही घटना उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये घडली.
कानपूरमध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता एक तरुण सायकलवरून स्टेट बॅंकेच्या पतारा शाखेत पोहोचला. पिस्तूल, चाकू, फावडे आणि सर्जिकल ब्लेड त्याच्याकडे होतं. जेव्हा गार्डने त्याला थांबवले तेव्हा त्याने गार्डवर चाकूने हल्ला केला. यानंतर, बँक मॅनेजर, कॅशियर आणि इतर बँक कर्मचाऱ्यांनी शिताफिने त्याला ताब्यात घेतले आणि बांधून ठेवलं. यावेळी बँक व्यवस्थापकासह तीन बँक कर्मचारी जखमी झाले. यात आरोपी तरुणही जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याचा मोबाईल फोन तपासला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली.
लविश मिश्रा नावाचा हा तरुण बीएससी तिसऱ्या वर्षासह आयटीआय करत होता. त्याला लवकर पैसे कमवायचे होते, म्हणून त्याने बँक लुटण्याची योजना आखली.आरोपीचा मोठा भाऊ अभय मिश्रा दिल्लीतील एका खाजगी कंपनीत काम करतो आणि त्याचे वडील अवधेश मिश्रा शेतकरी आहेत. कुटुंब पैशाच्या बाबतीत फार श्रीमंत नाही, म्हणून जेव्हा तो पैसे मागायचा तेव्हा त्याचे वडील त्याला स्वतः काही काम करायला सांगायचे.
पैसे कमवण्यासाठी, त्या तरुणाने शॉर्टकट पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि युट्यूबवर बँक दरोड्याचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. तो गेल्या एक वर्षापासून युट्यूबवर बँक दरोड्याचे व्हिडिओ पाहत होता. विशेष म्हणजे त्याने बहुतेकदा असे व्हिडिओ पाहिले होते ज्यात कोणीतरी एकट्याने बँक लुटली होती. ही संपूर्ण योजना आखल्यानंतर, त्याने स्टेट बँक ऑफ पटारा लुटण्याची योजना आखली. एकट्याने बँक लुटण्यासाठी, त्या तरुणाने त्याच्या हाताच्या तळहाताखाली सर्जिकल ब्लेड आणि पायात दाभण. हातात चाकू पिस्तूल आणि घेऊन तो थेट बॅंकेत घुसला
आरोपीने थेट बँकेच्या गार्डवर चाकूने हल्ला केला. खरंतर, त्याची योजना अशी होती की जर मी आधी गार्डवर हल्ला केला तर संपूर्ण बँक घाबरून जाईल. आरोपीने त्याच्या पाठीवर एक बॅग लटकवली होती ज्यामध्ये तो पैसे घेऊन जाऊ इच्छित होता. मात्र, त्याआधीच गार्डने धाडस दाखवले आणि पुढे जाऊन बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला डांबून ठेवले.
एसीपी रणजित कुमार यांनी सांगितले की, आरोपी तरुण शुक्रवारी एक दिवस आधी बँकेत आला होता, पण त्या दिवशी मोठी गर्दी असल्याने तो परतला असावा. पोलिस चौकशीदरम्यान, त्याने एक-दोनदा रेकी केल्याचेही कबूल केले. पोलिसांनी त्याला तुझी मैत्रीण आहे का? असे विचारले असता त्याने नाकारले. एसीपी म्हणतात की प्रत्येक पालक आपल्या मुलांना पैसे कमवायला सांगतो. त्याच्या वडिलांनीही तेच म्हटले होते. पण यासाठी तो संपूर्ण बँक लुटायला गेला. आता पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवले आहे.
पोलिसांना तरुणाच्या मोबाईल फोनवरून बँक दरोड्याच्या घटनेशी संबंधित सुमारे ५० व्हिडिओ सापडले आहेत. यावरून असे दिसून येते की तो किती काळापासून बँक लुटण्याची योजना आखत होता आणि त्याने प्रत्येक व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहिला होता. आरोपी लविशला अटक झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर पकडल्याचा कोणताही पश्चात्ताप दिसत नव्हता. तो पूर्ण अभिमानाने पोलिस ठाण्यात फिरत राहिला आणि पोलिसांना आपला अहंकार दाखवत तुरुंगात गेला.