अनेक खासदार-मंत्र्यांची तिकिटे कापणार; लोकसभा निवडणुकीतही भाजप देणार आश्चर्याचा धक्का

2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला पॅटर्न बदलून विजय संपादन केला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप असाच प्रयोग करणार आहे.

    नवी दिल्ली : 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला पॅटर्न बदलून विजय संपादन केला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप असाच प्रयोग करणार आहे. नुकतीच तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावावरून याची प्रचिती आली आहे. आता लोकसभा निवडणुकीतही हेच पॅटर्न राबवण्यात येईल, असे मानले जात आहे.

    सध्या भाजपचे लक्ष्य तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा एक नेता म्हणाला, यावेळी अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. काही केंद्रीयमंत्रीही रिकाम्या हाताने राहू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनाही उभे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या एका अंतर्गत सूत्रानुसार, लोकसभा निवडणुकीत भाजपाविजयी झाल्यास नवीन मंत्रिमंडळावर बारीक नजर ठेवावी लागेल. कारण काही जुने चेहरे काढून नवीन लोकांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. असेही घडू शकते, हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील घडामोडींवरून समोर आले आहे.

    याशिवाय संघटनात्मक बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान किंवा भूपेंद्र यादव यांच्यासारखे संघटनात्मक अनुभव असलेले नेते लवकरच नड्डा यांची जागा घेतील, असा काहींचा अंदाज होता.

    महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री चेहरा ?

    भाजपने हीच रणनीती अवलंबल्यास मनोहर लाल खट्टर यांना हरियाणातील सत्ता गमवावी लागू शकते. महाराष्ट्राबाबत पक्षाच्या रणनीतीबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जातात का, हे बघावे लागेल. प्रत्येक प्रकारची समीकरणे सोडवण्याची जबाबदारी नेतृत्वावर असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.