Chennai Accident : चेन्नईत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू? शनिवारपासून होते गायब, सौजन्य : आयएएनएस
शनिवारपासून बेपत्ता असलेले चार मुलांचे मृतदेह रविवारी चेन्नईच्या तिरुनिर्मलाई येथील तलावात (Chennai Accident) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नेमकं या मुलांचा मृत्यु कशामुळे झाला, याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
मृतांमध्ये दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. हे सर्व क्रॉमपेटच्या लक्ष्मीपुरममधील कृष्टा स्ट्रीटवर राहत होते. मृतांमध्ये के. देवदर्शन (12 वर्ष), डी. युवनेश (10 वर्ष), पूजा (13 वर्ष) आणि खुशी (13 वर्ष) यांचा समावेश आहे.
देवदर्शन येथील सरकारी शाळेत इयत्ता 7 वीचा विद्यार्थी असून पूजा व खुशी या 8 वीमध्ये शिकत होत्या. तर युवनेश एका खाजगी शाळेत 6 वीचा विद्यार्थी होता. पोलिसांच्या मते, मुलांना अखेरचे शनिवारी दुपारी घराच्या बाहेर खेळताना पाहण्यास मिळाले. त्यानंतर ते परिसरातून निघून गेले व घरी परतलेच नाही, ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला.
त्यांच्या आई-वडिलांनी नातेवाईक व मित्रांशी संपर्क केला. तसेच त्यांच्या शोधासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपचा आधार घेतला. त्यांचे फोटो व माहिती शेअर केली. त्यांनी त्यांच्याबाबत कोणतीही माहिती असेल तर ती देण्याचे आवाहन केले होते. शोधकार्यादरम्यान त्यांच्या कोणताच ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी क्रॉमपेट पोलीस स्टेशन गाठत त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तातडीने तांबरम, एग्मोर आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनसह केलंबक्कम बस टर्मिन्सवरील आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. रविवारी मात्र एक वाईट बातमी समोर आली. लक्ष्मीपुरमच्या जवळ असलेल्या तिरुनीरमलाई पेरिया एरी तलावात फेरण्यास गेलेल्या लोकांना पाण्यावर चार मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने याची पोलिसांना माहिती दिली.
पोलीस आणि तामिळनाडू अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने तलावात उतरून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळे येथे उपस्थित त्यांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी तांबरम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पोलीस आता या गोष्टीचा शोध घेत आहेत की, ही मुले एवढ्या लांब या तलावात पोहचली कशी. तसेच ते पाण्यात का उतरले. पोलिसांना शंका आहे की, ते तलावातील मातील रुतले असतील, ज्यामुळे ते बुडाले. दरम्यान, पोलीस विविध दृष्टीकोनातून घटनेचा आढावा घेत असून त्यांना यात काही काळबेर वाटल्यास त्या दिशेनेही ते तपास करणार आहेत.






