मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग (फोटो सौजन्य-X)
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील मुनसियारी येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर मुनसियारी येथील रालम येथील मैदानात उतरवण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांचे हेलिकॉप्टर मिलमच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार जोगदंडे हेही उपस्थित होते.
बुधवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार जोगदंडे यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी डेहराडूनहून हेलिकॉप्टरने मुन्सियारी येथील मिलम येथे ट्रेकिंगसाठी रवाना झाले होते.
मात्र मिलमच्या हिमालयीन भागात खराब हवामानामुळे पायलटला हेलिकॉप्टर पुढे नेणे कठीण झाले. अशा परिस्थितीत मिलमला पोहोचण्यापूर्वी हेलिकॉप्टरचे रालममध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर एका शेतात यशस्वीरित्या उतरवण्यात आले. दोन्ही अधिकारी सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भूपेंद्र मेहर यांनी सांगितले.
राजीव कुमार हे देशाचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 1 सप्टेंबर 2020 पासून ते निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक आयोगाचा भाग आहेत. त्यांनी 15 मे 2022 रोजी पदभार स्वीकारला आणि 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत ते पद सांभाळतील. राज्यघटनेनुसार निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असतो. तसेच एक दिवस आधी म्हणजेच १५ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळी त्यांनी ईव्हीएमशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही दिली. हरियाणा निवडणुकीत ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींना उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रत्येक तक्रारीला योग्य उत्तर लेखी दिले जाईल. ईव्हीएम एकदा नव्हे तर अनेक वेळा तपासले जातात.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 1984 च्या बॅचचे अधिकारी राजीव कुमार यांनी त्यांच्या दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये आणि बिहार/झारखंडमधील त्यांच्या राज्य केडरमध्ये काम केले आहे. B.Sc., L.L.B., PGDM आणि M.A. पब्लिक पॉलिसीच्या शैक्षणिक पदव्या धारण केलेल्या राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील कामाचा व्यापक अनुभव आहे.