file photo-social media
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गाव पोताली येथे राहणारे काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा सदस्य जोगा पोडियाम यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने छातीवर वार करून त्यांची हत्या केली.
पोताली येथील सीआयएएफ कॅम्पपासून घटनास्थळ अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. 10 वर्षांपूर्वी जोगा पोडियाम यांच्या मुलाचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
20 ते 30 नक्षलवादी साध्या वेशात
पोडियाम त्यांच्या घरी झोपले होते. रात्री 20 ते 30 नक्षलवादी साध्या वेशात तेथे आले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. जोगा पोडियम यांनी पोलिसांसाठी कोणतेही माहिती देण्याचे काम केले नाही. परिसरात दहशत पसरवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही घटना घडवून आणली. नक्षलवादी गुप्तहेर असल्याचा आरोप करून निष्पाप लोकांची हत्या करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून नक्षलवादी जोगा पोडियाम यांना ठार मारण्याचा इशारा देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.